Sanjay Madlik and Virendra Mandlik
Sanjay Madlik and Virendra Mandlik  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजकारणात नवा ट्विस्ट! खासदार संजय मंडलिक एकीकडं अन् मुलगा वीरेंद्र दुसरीकडं

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्यात वाद सुरू आहे. या वादात मुश्रीफ यांच्या पाठीशी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे हे उभे राहिले आहेत. याचवेळी खासदार मंडलिकांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक (Virendra Mandlik) यांनी समरजीत घाटगेंच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. खासदार एका गटात अन् मुलगा दुसऱ्या गटात असा नवा ट्विस्ट कागलमधील राजकारणात पाहायला मिळत आहे.

मागील वर्षी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत वीरेंद्र यांच्यासह त्यांच्या आत्या व आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुस्मिता यांचा पराभव झाला. हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आदींच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलमध्ये दोन्हीही उमेदवार होते. ‘गोकुळ’मध्ये आपला ठरवून पराभव केल्याचा आरोप वीरेंद्र मंडलिक यांनी त्यावेळी सोशल मीडियावर केला होता. त्यांचा रोख मुश्रीफ यांच्यावर होता. तेव्हापासून वीरेंद्र यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात आघाडी उघडली असून, आता त्यांचे समरजीत घाटगेंशी संबंध वाढले आहेत. घाटगेंच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमालाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळीही त्यांनी गोकुळच्या पराभवाची जखम उघड केली होती.

याचवेळी कागल तालुक्यात नुकतेच एका कार्यक्रमात मुश्रीफ, संजय घाटगे आणि संजय मंडलिक असे तिन्ही नेते एकत्र आले होते. कोण कधी जन्माला आला, यापेक्षा त्यांच्या कामाचे मूल्यमापन गरजेचे आहे, असा सल्ला खासदार संजय मंडलिक यांनी समरजित घाटगेंचे नाव न घेता दिला होता. ते म्हणाले होते की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझ्यासह मुश्रीफ व संजयबाबा घाटगे एकत्र काम करीत आहोत. मधल्या काळात हे दोघे मला जरा विसरले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यासह सीबीआय, प्राप्तिकर या माध्यमातून या देशांत एकप्रकारची अघोषित आणीबाणी आहे. या पद्धतीने नेत्यांना नामोहरम करून सत्ता हस्तगत करण्याची कटकारस्थाने रचली जात आहेत.

समरजित घाटगे यांनी समर्थकांसह काही दिवसांपूर्वी कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. याला प्रत्युत्तर म्हणून मुश्रीफ समर्थकांनी नुकताच जोरदार मोर्चा काढला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी कागल शहरातील राम मंदिराला राजकीय अड्डा बनवले आहे. हसन मुश्रीफ यांची जन्मतारखेवरून त्यांनी बदनामी सुरु केली आहे, असा आरोप समर्थकांनी केला होता. घाटगे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत हसन मुश्रीफ समर्थकांनी कागल पोलीस ठाण्यावर हा मोर्चा काढला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT