मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुढे करून पुन्हा मंत्रिपद मिळविण्यासाठी आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मातोश्रीवर 'फिल्डिंग' लावली आहे. तरीही, पूजा चव्हाण प्रकरण आणि वन खात्याच्या कारभाराबाबत राठोडांना शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नजरेतून 'क्लिनचिट' मिळण्याची शक्यता नाही. यामुळे राठोड पुन्हा मंत्री होणार नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, राठोड यांच्याजागी विदर्भातील चार आमदारांच्या नावांची चर्चा आता सुरू झाली आहे.
राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देऊन नामुष्की ओढवण्याच्या शक्यतेनेच त्यांना लांब ठेवण्याचा पवित्रा शिवसेना नेतृत्वाने घेतला आहे. ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण भोवले होते. विरोधकांच्या रेट्यामुळे ठाकरेंनी राठोडांना घरी बसविले. त्यानंतरच्या चौकशी पूर्ण झाल्याने मंत्रिपदासाठी राठोड यांचे प्रयत्न सुरू झाले. त्यातच पूजा चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी तक्रार मागे घेतल्यानंतर निर्दोष असल्याचे दाखवून राठोड आता वेगवेगळ्या मार्गाने मंत्रिमंडळात 'एन्ट्री' करण्याचा प्रयत्नात आहेत. ठाकरे सरकारमधील वजनदार नेते असलेल्या शिंदेंना घेऊन राठोड हे चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला गेले. तेव्हापासून त्यांच्या मंत्रिपदाची चर्चा रंगली आहे. परंतु, ठाकरेंच्या मनात तूर्त तरी राठोडांबद्दल स्थान नसल्याचे दिसत आहे.
पूजा चव्हाण प्रकरणांसह अन्य काही विषयही राठोड यांच्या वाटेत अडसर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी विदर्भातील शिवसेनेमधील एक गट राठोड यांच्याविरोधात सक्रिय झाला आहे. एकदा राज्यमंत्री आणि दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपद मिळवूनही राठोड यांनी यवतमाळमध्ये स्वतः शिवाय शिवसेनेचा एकही आमदार निवडून आणला नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला आहे. विदर्भातील दोन खासदारांनीही राठोडांबाबत नाराजीचा सूर कायम ठेवला आहे. असे असतानाही राठोड सातत्याने मुख्यमंत्री ठाकरेंपर्यंत पोचून मंत्री होण्यासाठी झटत आहेत. मात्र, राठोडांना संधी न देण्याची व्यवस्था काही मंडळींनी मातोश्रीवर आधीच करून ठेवल्याचे समजते.
मंत्रिपदासाठी राठोड यांच्याऐवजी विदर्भातील रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जैस्वाल, संजय रायमूलकर, नरेंद्र भोंडेकर, संजय गायकवाड यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते, असे समजते. हे मंत्रिपद मुंबईच्या वाट्याला आले; तर त्याजागी आमदार सुनील प्रभू यांच्या नावांचा प्राधान्याने विचार होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक यांच्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या असताना राठोडांना मंत्री करण्याची जोखीम मुख्यमंत्री ठाकरेच नव्हे; महाविकास आघाडीही घ्यायला तयारी नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.