Ramraje Naik Nimbalkar, Ranjeetsinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांचा रामराजेंना मोठा धक्का; रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जिंकली अर्धी लढाई

Satara : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिष्ठेची केलेली श्रीराम साखर कारखान्याची निवडणूक सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुढे ढकलली आहे.

Hrishikesh Nalagune

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिष्ठेची केलेली श्रीराम साखर कारखान्याची निवडणूक सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुढे ढकलली आहे. रामराजे निंबाळकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यातही राष्ट्रवादीचे मंत्री असूनही पाटील यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधी तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुरक भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संस्थापक सभासदांच्या वारसांना सभासदत्व मिळून मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी केली होती. तसेच बोगस सभासद वाढविल्याचा आरोपही भोसले यांनी केला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सहकार मंत्रालयाने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचा आदेश काल (15 मार्च) जारी करण्यात आला आहे.

प्रशासक नेमण्यासाठी विरोधकांचा कुटिल डाव : रामराजेंचा आरोप

दरम्यान, हा आदेश म्हणजे कारखान्यावर प्रशासक नेमण्यासाठी विरोधकांचा कुटिल डाव असल्याचा आरोप रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे. रणजितसिंह निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे श्रीराम साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. पण कालच्या सहकार विभागाच्या आदेशात प्रशासक नियुक्तीचा कुठलाही उल्लेख नाही. शासनाने केवळ निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अशा प्रकारे प्रशासक नेमता येत नाही त्याबद्दल आम्ही उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. कारखान्यावर प्रशासक नेमण्यासाठी त्यांनी कुटिल डाव खेळला असा घणाघाती आरोप आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला. कारखान्याला ऊर्जितावस्था येत असताना गेली पंधरा वर्षे माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले कुठे होते? इतर नेत्यांची नावे घेऊन तुम्ही कशाला निवडणुकीला सामोरे जाता. एकदा तरी स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढा. आम्हीही निवडणुकीसाठी सज्ज आहोत, असे आव्हानही रामराजे यांनी यावेळी दिले.

प्रशासक नियुक्त केला की काय परिस्थिती होते हे आपण फलटण नगरपालिकेमुळे पाहत आहोत. प्रशासक त्यांच्यामागे नंदीबैलासारखा फिरून त्यांनी सांगितलेली कायदेशीर आणि बेकायदेशीर कामे करत असतो. हीच परिस्थिती त्यांना श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत अप्रत्यक्षरीत्या चुकीचे निर्णय घेऊन करायची आहे. पण हे कारस्थान आपण यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही रामराजे यांनी या वेळी दिला.

निवडणूक प्रशासक नेमून पारदर्शक पद्धतीने व्हावी : रणजितसिहांकडून स्वागत

श्रीराम कारखान्याची निवडणूक प्रशासक नेमून पारदर्शक पद्धतीने व्हावी ही सगळ्या सभासदांची इच्छा आहे. मृत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी आम्ही सुरू केलेली लढाई आता न्यायालयात गेली आहे. कायदेशीर लढाई विश्वासराव भोसले व अॅड. नरसिंह निकम लढणार आहे. त्यांना सर्वतोपरी सहकार्य आम्ही करणार आहोत, अशी भूमिका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जाहीर केली.

संस्थापक सभासदांच्या वारसांना हक्क हवा : विश्वासराव भोसले

कारखान्याने मृत सभासदांच्या वारसांना सभासदत्व दिले नाही. म्हणून आम्ही हरकत दाखल केली. त्यावर मृत सभासदांची नावे कमी करण्याचा आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्यावर उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. संस्थापक सभासदांना कारखान्याने शेअर्स ट्रान्सफरबाबत सूचना द्यायला पाहिजे होती. तसे न करता बोगस सभासद वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे संस्थापक सभासदांच्या वारसांना सभासदत्व मिळवून मतदानाचा अधिकार देण्याची भूमिका याचिकेमध्ये आहे," असे विश्वासराव भोसले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT