सोलापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार देणारे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला असून अगोदरच गटांगळ्या खाणारा पक्ष सोलापुरात आणखी कमजोर झाला आहे.
दरम्यान, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू काॅंग्रेसचे माजी अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे व इतर नेते होते. येत्या 31 मे रोजी अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिद्धाराम म्हेत्रे आणि त्यांचा समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. म्हेत्रे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला अक्कलकोटमध्ये मोठा नेता मिळाला असून काँग्रेस मात्र सोलापुरातून हळूहळू हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.
काँग्रेसचे सोलापूर प्रभारी मोहन जोशी हे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी म्हेत्रे यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती जोशी यांनी केली होती. मात्र, प्रकृतीचे कारण सांगून म्हेत्रे यांनी जिल्हाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता, एकीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार देणाऱ्या सिद्धाराम म्हेत्रे यांनी दोनच दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाला सोलापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे.
सिद्धाराम म्हेत्रे यांचा अक्कलकोटमधील मातोश्री शुगर हा कारखाना गेल्या काही वर्षापासून अडचणीत होता. कर्जाची परतफेड न केल्याने बॅंकेकडून त्यांच्या मालमत्तेची जप्तीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे म्हेत्रे हे अडचणीत होते. अडचणीतील म्हेत्रे यांना सत्तेच्या टॉनिकची गरज होती, त्यामुळेच त्यांनी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिद्धाराम म्हेत्रे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना त्यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्हावे, अशी विनंती केली होती. मात्र, त्यावेळीही त्यांनी जिल्हाध्यक्ष होण्यास नकार दिला होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला, यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणात आमच्या कार्यकर्त्यांना होणारा त्रास, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.