
Solapur, 16 May : भारतीय जनता पक्ष हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत मजबूत पक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप फार ताकदीने लढणार आहे. काही लोकं सोबत येतील. काँग्रेसमधील काही नेते आणि अन्य पक्षाचे लोकंही येतील. जे लोक भाजपची विचारधारा स्वीकारतील, पक्षात प्रवेश करून भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेऊन काम करतील, अशा लोकांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करण्याचे काम आम्ही करू, असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना गोरे यांनी काँग्रेसमधील काही नेते भाजपमध्ये येणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यात त्यांनी काँग्रेसमधील नेत्याच्या भाजप प्रवेशाबाबत केलेलं भाष्य कोणाच्या संदर्भाने आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गोरे म्हणाले, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Solapur Bazar Samiti) विजयाबद्दल आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. बाजार समितीची निवडणूक ही सहकाराची निवडणूक होती. बाजार समितीमधील निवडणुकीबाबत आमच्या पक्षात मतमतांतरे होती. मात्र, सगळ्याच ठिकाणी पक्षाची लोक विजयी झाली, याचा मला आनंद आहे.
भाजपची विचारधारा मान्य आहे, ते लोकं आगामी काळात आमच्यासोबत येतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीचा झेंडा फडकेल, असा दावाही गोरे यांनी केला आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांना सोबत घेऊन भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पॅनेल उभे केले होते. त्याविरोधात भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येऊन पॅनेल उभे केले होते. त्यात कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांच्या पॅनेलने सत्ता मिळविली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणुकीनंतर काही नेत्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.
विमान कंपन्यांशी पुन्हा चर्चा करेन
सोलापूर विमानसेवेबाबत गोरे म्हणाले, सोलापूर-गोवा विमानसेवेचे आज तिकीट बुकिंग सुरू होणार होते. मात्र, काही गोष्टी आहेत. कोणतीही कंपनी तोट्यात येऊन विमानसेवा सुरु करू शकणार नाही. विमानसेवा 26 मे रोजी सुरू होईल, असं कंपनीने सांगितलं होतं. आता मी पुन्हा कंपनीशी चर्चा करेन की नेमकी काय परिस्थिती आहे.
सोलापुरातील अंतर्गत जलवाहिनीसाठी 850 कोटी मंजूर
सोलापूर-उजनी दुहेरी जलवाहिनी पूर्ण झाल्याचा आनंद आहे. त्याचे आज किंवा उद्या टेस्टिंगदेखील होईल, त्यानंतर थेट पाणी उजनीतून येईल. अधिकचे पाणी मिळविण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात अडचणी होत्या. मात्र, आता त्या अडचणीदेखील दूर झाल्या आहेत, त्यामुळे हे शुद्धीकरण केंद्र लवकरच होईल आणि त्यानंतर अधिकचे पाणी सोलापूरला मिळेल. शिवाय शहरातील अंतर्गत पाईपलाईनसाठी 850 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले आहेत, असेही गोरेंनी सांगितले.
कोणी कोणाची अटक थांबवली हे उद्धव ठाकरेंना विचारा
संजय राऊत यांच्याबद्दल अधिक बोलू नये. महाराष्ट्रमध्ये त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. हे पुस्तक देखील कोणी गांभीर्याने घेणार नाही. कोणी कोणाची अटक थांबवली, हे उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे.
माण खटावचे पाणी
पृथ्वी असेपर्यंत माण-खटावला पाणी येणार नाही, असं काही राजकारणी म्हणायचे. पण, मी आमदार झाल्यापासून पाण्यासाठी प्रयत्न केले, तेव्हा आज पाणी आलं. लोकांना हे आजही स्वप्न वाटतं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ताकद उभी केली, त्यामुळे शक्य झालं आहे. प्रत्येक वर्षी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जातं, त्यामुळे ह्या षडयंत्राला गांभीर्याने घेऊ नये. षडयंत्र रचणारे काही जेलमध्ये आहेत, काहींची चौकशी सुरु आहे, असे गोरेंनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.