Kisan Veer Sugar Kamgar andolan
Kisan Veer Sugar Kamgar andolan SYSTEM
पश्चिम महाराष्ट्र

थकित पगारांसह विविध मागण्यांसाठी 'किसन वीर'च्या कामगारांचे ठिय्या आंदोलन

विलास साळुंखे

भुईंज (ता. वाई) : किसन वीर सातारा सहकारी साखर कामगारांचे गेल्यादोन वर्षांपासून रखडलेले २३ पगार व विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर आजपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या वेळी कामगार संघटनेच्या पदाधिका-यांनी कारखाना व्यवस्थापन व कार्यकारी संचालक, कामगार अधिकारी यांच्या कार्यपध्दतीबाबत संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होण्याबाबत दिवसेंदिवस अडचणी वाढत असताना एका बाजूला शिवारात दीड ते पावणे दोन वर्षापासूनचा ऊस उभा असून त्याची विल्हेवाट लागावी, यासाठी धडपडणारा शेतकरी सभासद सोमवारी पुन्हा एकदा हतबल झाला.

कामगारांनी आज ना उदया पगार होईल, अशी वाट पाहून पदाधिकारी व व्यवस्थापन यांच्या आश्वासनाला कंटाळून आपल्या दोन वर्षांच्या पगारासाठी आज अखेर काम बंद ठेऊन कारखान्याच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. याप्रसंगी कामगारांच्या प्रतिनिधींनी आपल्या भावना मांडताना कार्यकारी संचालक व कामगार अधिकाऱ्यांच्या विषयी संतप्त भावना व्यक्त केल्या. कामगारांच्या विविध मागण्या मान्य झाल्या तर कारखाना आताही सुरु करु, असे कामगार पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कामगारांचे थकीत असलेला पगार त्वरीत द्यावा, कामगारांची थकीत असेलेले पीएफ, ग्रॅज्युअटी व एलआयसी त्वरीत भरावी. कामगारांना २०१४ पासून लागू केलेली १५ टक्के पगारवाढ व फरक रक्कम त्वरीत देण्यात यावी, कामगारांचे थकीत असलेले सर्व बोनस त्वरीत देण्यात यावेत. हंगाम सेवकांचे थकीत रिटेंशन व रजेचा पगार मिळावा, कामगारांचे एप्रिल २०१९ पासून लागू केलेली १२ टक्के पगार वाढ व फरक रक्कम त्वरीत देण्यात यावी.

तसेच व्यवस्थापनाने ठरविलेल्या तात्पुरत्या कर्मचा-यांना हंगामी करणे, राहिलेल्या ८३ लोकांचे ग्रेडेशन करणे, कामगारांच्या पगारातून कपात झालेली दोन्ही सोसायटींची रक्कम दोन्ही सोसायटींना त्वरित जमा व्हावी, या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्यात त्यानंतरच कामगारांकडून कारखाना चालू करण्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य मिळेल, असा कामगारांनी इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT