Ujani Dam Incident  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ujani Dam Incident : उजनीत बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह 36 तासानंतर सापडले; एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

अण्णा काळे

Solapur, 23 May : उजनी धरणात करमाळ्यातील कुगाव आणि इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावादरम्यान बोट उलटून बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह सुमारे ३६ तासांनी सापडले. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांसह करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांच्या मुलाचा समावेश आहे. दरम्यान, या सहा जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. एनडीआरएफचे पथक व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे शोध कार्य पार पडले.

करमाळ्यातील (Karmala) कुगाव येथून बोटीत बोटचालकासह सात जण मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदापूर (Indapur) तालुक्यातील कळाशीकडे निघाले होते. मात्र, जोरदार वारा आणि उजनी धरणातील (Ujani Dam) लाटांमुळे बोट बुडाली. मात्र, बोटातील पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे पोहून कळाशी काठ गाठला आणि स्वतःचा जीव वाचवला. मात्र इतर सहाजण हे धरणात बुडाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही घटना समजल्यानंतर काही नागरिकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केल. मात्र, अंधारामुळे शोध मोहिमेत अडथळे येत होते. एनडीआरएफचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी बुधवारी दिवसभर शोध मोहिम राबवली. पण, त्यांना बुडालेला सहा जणांचा शोध लागला नाही. अखेर आज सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास या सहा जणांचे मृतदेह हाती लागले.

गोकुळ जाधव, कोमल जाधव या पती पत्नीसह तीन वर्षांची मुलगी वैभवी (माही), दीड वर्षाचा मुलगा शुभम जाधव (सर्व रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), तर आदिनाथ सहकारी साखर काखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव डोंगरे आणि बोटचालक अनुराग अवघडे (दोघेही रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) या सहाही जणांचे मृतदेह आज सकाळी हाती लागले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार दत्तात्रेय भरणे, माजी आमदार नारायण पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव बंडगर, मकाई कारखान्याचे संचालक पिसाळ, भाजपचे गणेश चिवटे, नानासाहेब लोकरे, तानाजी झोळ, दत्तात्रय सरडे चंद्रकांत सरडे यांनी शोध मोहीम सुरू असताना घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला सूचना केल्या.

बोट धरणात आणि वादळ सुटले

उजनी धरणात करमाळा तालुक्यातून केत्तूर ते चांडगाव, वाशिंबे ते गंगावळण, कुगाव ते कळाशी, कुगाव ते कालठण, कुगाव ते शिरसोडी, चिखलाठाण ते पडस्थळ, ढोकरी ते शहा या ठिकाणावरून यांत्रिक बोटीच्या साह्याने इंदापूर तालुक्यातील गावांना प्रवासी वाहतूक केली जाते. या बोटीत आपत्कालीन व्यवस्थेसाठी लागणारी साधने ठेवलेली आहेत. परंतु या घटनेत त्याचा वापर करण्याएवढा वेळ मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. वाऱ्यामुळे धरणात लाटा निर्माण झाल्यानंतर शक्यतो धरणात बोटी सोडल्या जात नाहीत. पण ही बोट सुटल्यानंतर वादळ सुटले, तोपर्यंत बोट धरणाच्या मध्यभागी आली होती. अचानक आलेले वादळ आणि लाटांचे रौद्ररुप यामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT