Kumar Ashirwad  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांना तंबी; हलगर्जीपणा करू नका

Anand Surwase

Solapur News : यंदा पावसाने दडी मारल्याने सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात दुष्काळाशी दोन हात करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामात कोणताही हलगर्जीपणा करू नये, अशी तंबी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत ते आशीर्वाद बोलत होते.

जानेवारी 2024 पर्यंत पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करा

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, "सोलापूर जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणात पाण्याचा साठा अत्यल्प आहे. त्यामुळे आगामी काळातील नियोजन आत्तापासूनच करावे, जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा आढावा घेऊन जिथे गरज असेल तिथे जानेवारीपासून पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या उपाययोजना कराव्यात.

यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाने दुष्काळी भागात टंचाईच्या उपाययोजना राबवाव्यात. त्याबाबतचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करावा. जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्व गावांमधील पाणीपुरवठा योजनेची कामे जानेवारी 2024 अखेरपर्यंत पूर्ण करावीत, यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेती कर्जाची वसुली थांबवा

दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणी, चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी पाहणी करावी. टँकरसाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या स्राेताची पाहणी करून घ्यावी. यासाठी गावपातळीवर बैठका घ्याव्यात. प्रत्येक शासकीय यंत्रणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामाला लागावे.

दुष्काळी भागात बँकांनी शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती द्यावी, यासाठी जिल्हा अग्रणी बँकेने सर्व शाखा व्यवस्थापकांना सूचना द्याव्यात, कर्ज वसुलीच्या तक्रारीसंदर्भात बँकांनी तहसीलदारांकडे नोटीस द्याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

ज्या भागात दुष्काळ जाहीर झाला आहे. त्या ठिकाणी अवैध पद्धतीने पाण्याचा वापर अथवा उपसा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वीज वितरण विभागाने यासाठी उपाययोजना कराव्यात. याच बरोबर जिल्ह्यातील दुष्काळी भागात पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी उपायोजना करून द्याव्यात. ज्या भागात पाणी आहे, त्या ठिकाणी चारानिर्मितीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना पशुसंवर्धन विभागालाही देण्यात आल्या आहेत.

पाणीपुरवठा, नळ जोडणी योजना पूर्ण करा

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेतील विहीर पुनर्भरण, अटल भूजल योजना, नळ जोडणी योजनांची कामे जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करावीत, यासाठी सर्व गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी टँकर सुरू करण्याच्या अनुषंगाने पाहणी करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. टंचाई परिस्थिती हाताळण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी भागात मिळणार सवलती

सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, बार्शी, सांगोला व माळशिरस या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे, तर सुधारित निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील 45 मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या सर्व गावांमध्ये जमीन महसूल सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलामध्ये 33.5 टक्के सूट, तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी दिली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT