Sushilkumar Shinde, Dhavalsinh Mohite Patil
Sushilkumar Shinde, Dhavalsinh Mohite Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress News: सोलापूर काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण; शिंदेंच्या खेळीमुळे मोहिते पाटलांना धक्का

सरकारनामा ब्यूरो

Solapur News: सोलापूर काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या निवडीवरुन पक्षात शिंदे आणि मोहिते गटांमध्ये मागील अनेक दिवसांपासून गटातटाचा सुप्त वाद पेटला आहे. मात्र, सध्यातरी यात शिंदे पिता-कन्येने पदाधिकार्‍यांच्या निवडींना स्थगिती मिळवून 'हम है काँग्रेस के सिंकदर' याचा प्रत्यय आणून देत अकलूजच्या सिंहाला चांगलाच ‘हात’दाखवला आहे. आता स्वाभिमान दुखावलेला अकलूजचा सिंह शिंदेशाहीविरोधात डरकाळ्या फोडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अकलूजचे मोहिते-पाटील घराणे पर्यायाने डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांची जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाची निवड यामध्ये काँग्रेसमधील बडे प्रस्थ सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि त्यांची आमदार कन्या प्रणिती शिंदे हे दुखावलेले गेलेले आहे. त्यातच पुन्हा डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी शिंदे पिता-कन्येला विश्‍वासात न घेता जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या केलेल्या परस्पर निवडी हे सर्व पाहता ‘जखम जुनीच, ओरखडा मात्र नवा’असेच निरीक्षण याबाबतीमधील नोंदवता येणार आहे.

सुशीलकुमार शिंदे यांचा विरोध असताना डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांना जिल्हा काँग्रेस (congress) कमिटीच्या अध्यक्षपदाचे सिंहासन बहाल केले गेले. तद्नंतर या पदाची गादी सांभाळताना डॉ. मोहिते-पाटील यांच्याकडून शिंदे पिता-कन्येच्या मनाविरूध्द काही गोष्टी घडलेल्या गेल्या आहेत.

शिंदे पिता-कन्येनं ‘हात’दाखविल्यानंतर ‘हम भी कुछ कम नही’अशी डरकाळी फोडत म्हणे अकलूजच्या सिंहाने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना गाठलं. आपण केलेल्या निवडी योग्यच आहेत, काँग्रेस सभासद नोंदणी आणि भारत जोडो या अभियानामध्ये ज्यांनी प्रभावी काम केले, त्या कामांना ‘स्टेथोस्कोप’ लावूनच आपण यापदाच्या निवडी केल्याचा सूर डॉ. धवलसिंहानी आळवत निवडीला दिलेली स्थगिती मागे घेण्याबाबत काँग्रेसच्या नाना यांना पटवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी मात्र त्यांनी मोहिते-पाटील यांना ‘नन्नाचा पाढा’ ऐकवला.

दरम्यान, त्याला कारणदेखील तसेच असावे. सुरुवातीला डॉ.धवलसिंहाची आणि पुढे प्रदेश प्रवक्तेपदी प्रा.मनोज कुलकर्णी यांच्या निवडी करताना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी स्पीचच्या पुढे जाऊन बॅटीग केली होती, त्याची मोठी गहजब शिंदे पिता- कन्येनं केवळ प्रदेशच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेसमध्ये केली होती.

लोकसभा निवडणूक अन् विश्‍वासामधील चेहरे...

डॉ.धवलसिंहांनी पदाधिकारी म्हणून निवडलेल्या चेहर्‍यांना विरोध आहे. पदाधिकारी म्हणून जे काही चेहरे निवडायचे आहेत, ते चेहरे खास करुन सुशीलकुमार शिंदे यांच्या मर्जीमधील आणि त्यातही विश्‍वासाचे हवेत. सोलापूर लोकसभेची निवडणुक काँग्रेसकडून लढण्याचा निर्णय सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबतीत होण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेसच्या खास करुन सोलापूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकार्‍यांचा निवडीचा विषय महत्वाचा वाटतो. म्हणून शिंदेशाहीचा ‘व्होरा’ पदाधिकारी निवड स्थगितीचा असावा असा बोलबाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT