Solapur, 05 July (प्रमिला चोरगी) : सोलापूर महापालिकेत अंधाधुंद कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. शासकीय सेवेत असूनही काही अधिकारी आणि कर्मचारी हे ठेकेदारी, पास्टर (धर्मगुरु) आणि थर्ड पार्टी एजन्सीचा सूत्रधार म्हणून काम करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तक्रारीनंतर आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई करून त्यांची चौकशी होणे गरजेचे असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदावर कायम ठेवून चौकशी केली जात आहे, त्यामुळे या प्रकरणातील वास्तव समोर येण्याची शक्यता कमीच आहे.
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांपासून लिपिकांपर्यंतच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांपर्यंत अशा स्वरुपाच्या आणखी अनेक तक्रारी बंद फाईलींमध्ये असल्याची चर्चा महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात रंगली आहे.
सहाय्यक अभियंता बनला ठेकेदार
महापालिकेच्या विभागीय कार्यालयात सहायक अभियंता म्हणून शासकीय सेवा बजावत असताना श्याम कन्ना खासगी बांधकामाचा ठेका घेत ठेकेदारी करत असल्याचे पुढे आले आहे. जागामालकाकडून अतिरिक्त पैशाची मागणी केल्यामुळे त्यांनी थेट महापालिका आयुक्तांकडेच तक्रार केली आहे, त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेली कन्ना यांची ठेकेदारी उघडकीस आली आहे.
शासकीय सेवेत असताना नियमानुसार खासगी कामे (ठेकेदारी) करता येत नाही. मात्र सहायक अभियंता कन्ना यांनी कुमठा नाका येथील मार्कंडेय नगरातील नागनाथ कुंटोजी यांच्या बांधकामाचा ठेका घेतला होता. आपण अधिकारी असून तुमच्या बांधकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, असे सांगून तब्बल ६० लाख रुपयाचा ठेका घेतला. ठरलेली रक्कम वेळोवेळी देऊनही पुन्हा २१ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली गेली. अतिरिक्त पैसे न दिल्याने बांधकामातील चुका काढून कारवासाठी पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकत नोटीस पाठवून पैशाची मागणी करीत आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केलेल्या तपासणीत तथ्य आढळून आले. त्यामुळे श्याम कन्ना याच्या चौकशसाठी उपायुक्त गिरीश पंडित, मुख्य लेखापरीक्षक वाघमोडे, ऑडिट विभागाचे दीपक राजपूत यांची समिती नेमली आहे.
आरोग्य कर्मचारी बनला धर्मगुरु (पास्टर)
महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले दत्तात्रय उर्फ येहान कामेपागूल यांनी बापूजी नगरमधील समाज मंदिराचे चर्चमध्ये रूपांतर केले. त्या चर्चेमध्ये स्वतः जिजस गॉस्पेल सोसायटीचे मुख्य पास्टर म्हणून काम करत आहेत, अशी तक्रार आयुक्त सचिन ओम्बासे यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी आयुक्तांनी चौकशी लावल्याची माहिती आहे.
गोपनीय माहिती खासगी संस्थेला पुरवली
महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली शिरशेट्टी यांच्यावर सरकारला पाठविण्यात येणारी माहिती चुकीची देणे तसेच गोपनीय माहिती खासगी संस्थेला पुरवल्याचा आरोप आहे. महापालिकेतील गोपनीय माहिती खासगी संस्थेला पुरवून त्या संस्थांचे हित जपले गेल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे.
थर्ड पार्टीचे काम करणारा तो अधिकारी कोण?
महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामांच्या निविदा काढणे, कामांचे ठेके देणे, त्या कामांची थर्ड पार्टी तपासणी करून आणि अंतिम बिलांवर स्वाक्षरी करणे ही सर्व प्रक्रिया एकच अधिकारी करत असल्याची चर्चा आहे. संबंधित अधिकारी शासकीय सेवेत असताना निविदा प्रक्रिया राबवत असून तोच कामांची थर्ड पार्टी तपासणी आणि बिलं काढण्याचे कामही करत असल्याचे सांगितले जात आहे. तो अधिकारी कोण याच्या शोधासाठी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.