Solapur Reservation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोठे, देशमुख, नरोटे, चंदनशिवेंना अनुकूल आरक्षण; माजी महापौर, उपमहापौरांचा पत्ता होणार कट

महिला आरक्षणामुळे आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस; काही माननीयांना शोधावे लागणार सुरक्षित प्रभाग

सरकारनामा ब्यूरो

प्रमिला चोरगी

सोलापूर : बहुप्रतिक्षित महिला आरक्षण सोडत आज जाहीर झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला, तर काहींचा हिरमोड झाला. महिला आरक्षणामुळे सोलापूरचे (solapur) माजी महापौर, सभागृहनेते, गटनेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर यांचा पत्ता कट होणार हे उघड झाले आहे. त्यामुळे प्रभाग रचना आणि आरक्षण (Reservation) अशी दोन्ही सोय पाहणाऱ्या पदाधिकऱ्यांची ठराविक प्रभागामध्ये गर्दी होणार आहे. यामध्ये माजी महापौर महेश कोठे, आमदार विजयकुमार देशमुख (चिरंजीव किरण देशमुख यांच्यासाठी), माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, एमआयएमचे फारूख शाब्दी आदी नेते किंवा त्यांच्या कुटुंबीयासाठी अनुकूल आरक्षण पडले आहे. मात्र, काही माननीयांना सुरक्षित प्रभाग शोधावा लागणार आहे. (Solapur Reservation: Favorable Reservation for Kothe, Deshmukh, Narote, Chandanshive)

महापालिका पंचवार्षिक निवडणूक-२०२२ साठीचे महिला आरक्षण आज जाहीर झाले. प्रारुप प्रभाग रचनेत अडचणीत आलेल्या माजी गटनेत्यांमध्ये काँग्रेसचे चेतन नरोटे वगळता इतर सर्वच गटनेते, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते हे अंतिम प्रभाग रचनेमध्ये अडचणीत आले होते. त्यामुळे सर्वच पदाधिकारी एक नव्हे; तर तीन-तीन प्रभागांवर दावा करीत सोयीचे असल्याचे ठामपणे सांगत होते. मात्र, आज महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षातील मातब्बर पदाधिकाऱ्यांचा पत्ता कट होण्याच्या मार्गावर आहे.

आरक्षणाची सोय पाहिली तर गैरसोयीचे प्रभाग पदरी पडणार. जर प्रभाग सोयीचा पाहिला तर आरक्षणामुळे पत्ता कट होण्याची भीती आणि आरक्षणासह सोयीचा प्रभाग पदरी पाडायचा असल्यास मातब्बरांच्या स्पर्धेत निभाव लागणे मुश्किल अशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. महिला आरक्षणाच्या सोडतीनंतर ७० टक्के नगरसेवकांना ‘मी नाही ती’ अशीच भूमिका घेण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे ठराविक प्रभागांमध्ये इच्छुक पदाधिकाऱ्यांची गर्दीही वाढणार असल्याने यामध्ये कोणाचा निभाव लागणार, हे निवडणूकच ठरविणार आहे.

प्रभागनिहाय इच्छूक आणि आरक्षणानंतरची स्थिती

प्रभाग क्रमांक १ व २ ची रचना आणि आरक्षण हे माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्यासह इतर नगरसेवकांसाठी सोयीचे ठरले आहे.

प्रभाग क्रमांक ३ व ४ ची रचना आणि आरक्षण या दोन्हीबाबतीत कोठे सैनिकांना सोयीचा आहे. या प्रभागातून महेश कोठे, प्रथमेश कोठे हे आपले नशीब आजमावू शकतात.

प्रभाग क्रमांक ५, ६, ७ या तीनही प्रभागात माजी सभागृह नेते सुरेश पाटील, अंबिका पाटील, संजय कोळी यांचा पूर्वीचा परिसर विभागून आला आहे. या तीनही प्रभागात मातब्बर इच्छुक उमेदवारांची संख्याही अधिक आहे. त्यातच दोन प्रभागात महिलांसाठी दोन जागा राखीव झाल्याने इच्छुकांमध्ये रस्सीखेच असणार आहे.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्याविरोधात रिपब्लिकन, बसपा, वंचित, भाजप असे सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. चंदनशिवे यांना आरक्षण सोयीचे ठरले असले तरी स्पर्धकांना तोंड देणे जड जाणार आहे.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये सर्वसाधारण एक महिला आणि दोन पुरुष असे आरक्षण आाहे. या ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांची गर्दी आहे. या प्रभागावर देवेंद्र कोठे, मनोहर सपाटे, पुरुषोत्तम बरडे, अमोल शिंदे, किरण पवार यांची करडी नजर आहे.

प्रभाग क्रमांक १२ प्रभागाची रचना बदलून अनुसूचित जातीचे आरक्षण हटविण्यात माजी गटनेते चेतन नरोटे यांना यश आल्याने त्यांचा मार्ग सुरळीत झाला आहे.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. या एकाच प्रभागामध्ये बनशेट्टी, भोगडे, थोबडे, तडळवकर, पाटील आदी मातब्बर मंडळी इच्छुक आहेत. त्यामुळे माजी महापौर, माजी सभागृह नेते अडचणीत आले आहेत.

प्रभाग क्रमांक १६, १७, १८, १९ या चारही प्रभागामध्ये पद्मशाली समाज मोठा आहे. त्यामुळे महेश कोठे यांच्यासह कोठे सैनिकांसाठी हा प्रभाग सोयीचा आहे. नागेश वल्ल्याळ यांचा प्रभागच विखुरला गेला आहे. आरक्षणामुळे सोयीचा प्रभाग शोधणे अडचणीचे ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक २० हा सर्वात मोठा प्रभाग असून तीनही जागांपैकी एकाच जागेवर महिला आरक्षण आहे. या परिसरात रियाज खरादी, तौफिक हत्तूरे, फारुक शाब्दी यांचे बंधू, खैरवी अशी दिग्गज मंडळी इच्छुक असल्याने माजी गटनेते रियाज खरादी यांची गैरसोय होणार आहे.

प्रभाग क्रमांक २१ मध्ये फुलारी, करगुळे, आरिफ शेख, नगसिंग कोळी आदींसाठी सोयीचा प्रभाग आहे. आरक्षण सोयीचे नसले तरी खुल्या गटातून निवडणूक लढविण्याची तयारी अनेकांनी ठेवली आहे.

प्रभाग क्रमांक २३ मध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. खुल्या एका जागेवर नागेश गायकवाड, दिलीप कोल्हे, गणेश वानकर हे इच्छुक आहेत.

प्रभाग क्र. ३५ ची रचना उपमहापौर राजेश काळे यांना सोयीची ठरली होती. परंतु येथील जागा अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाल्याने त्यांना नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.

प्रभाग क्र. ३७ मध्ये एक महिला उर्वरित दोन जागा खुल्या आहेत. रचना व आरक्षण या दोन्ही बाजू माजी नगरसेवक वैभव हत्तूरे यांच्या सोयीची असली तरी शेजवाल, हुच्चे या नगरसेवकांना अडचणीत आणणारी आहे.

प्रभाग क्र. ३८ हा दोन सदस्यांचा असून माजी आमदार दिलीप माने गटाचे वर्चस्व असलेला हा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला आहे.

महिला आरक्षणाची वर्गवारी

महापालिका निवडणुकीसाठीच्या एकूण ३८ प्रभागांतील ११३ सदस्यांपैकी ५७ जागा महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. एकूण अनुसूचित जागांसाठी राखीव असलेल्या एकूण १६ प्रभागांपैकी प्रभाग क्र ५, ९, १०, २३, २४, २८, ३३, ३६ हे आठ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग क्र २४ व ३५ यामध्ये प्रभाग क्र ३५ हा अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाला आहे. तर उर्वरित ४८ खुल्या जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT