Solapur mayor Candidate Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Mayor : सोलापूरचे महापौरपद खुले; भाजपची ही तीन नावे आघाडीवर

Mayor Reservation: सोलापूर महापालिकेचे महापौरपद खुले झाल्याने भाजपमधील अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली असून नरेंद्र काळे, विनायक कोंड्याल आणि अनंत जाधव यांची नावे आघाडीवर मानली जात आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 22 January : सोलापूर महापालिकेचे महापौरपद खुले झाले आहे, त्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या 49 नगरसेवकांपैकी अनेकांनी दावेदारी केली आहे. मात्र, प्रामुख्याने विनायक कोंड्याल, अनंत जाधव आणि नरेंद्र काळे यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. काळे हे मूळ भाजपचे आहेत, शिवाय संघ परिवरातून येत असल्याने ते महापौर होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे, कोंड्याल हे चार वेळा निवडून आले असून आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत, तर अनंत जाधव हे मराठा असून त्यांनी महापौरपदासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. याशिवाय, डॉ. किरण देशमुख, प्रथमेश कोठे यांचीही नावे चर्चेत आहेत.

सोलापूर (Solapur) महापालिकेच्या निवडणुकीत ८७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे, त्यामुळे महापौरपदाच्या आरक्षणाकडे शहराचे लक्ष लागले होते. या वेळी कोणत्या प्रवर्गाला संधी मिळते, याची उत्सुकता होती. आज सकाळी जाहीर झालेल्या आरक्षणात सोलापूरचे महापौरपद हे खुले झाले आहे, त्यामुळे आता खुल्याबरोबर इतर प्रवर्गातील नगरसेवकांना महापौरपदाची संधी मिळू शकते. मात्र, त्यासाठी हायकमांडचा आशीर्वाद महत्वाचा ठरणार आहे.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे तब्बल 49 नगरसेवक हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत. त्यामध्ये 24 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे, यातील अनेकजण महापौरपदासाठी (mayor) इच्छूक आहेत. मात्र, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, आमदार देवेंद्र कोठे यांचे मेहुणे विनायक कोंड्याल आणि अनंत जाधव यांचा समावेश आहे.

विनायक कोंड्याल हे चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, शिवाय ते आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचे निकटवर्तीय असलेले आमदार कोठे यांच्यामुळे त्यांना महापौरपदाची लॉटरी लागू शकते. कोंड्याल हे प्रभाग क्रमांग 12 मधून निवडून आले आहेत. ते कोठे गटाकडून प्रमुख दावेदार आहेत. कोठे यांचे निकटवर्तीय असल्याचा त्यांना फायदही होऊ शकतो, तसा शह-कटशहाच्या राजकारणामुळे तोटाही होऊ शकतो.

कोंड्याल यांच्यासोबत नगरसेवक अनंत जाधव हेही महापौरपदासाठी इच्छूक आहेत. ते आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. हे प्रभाग क्रमांक 4 मधून निवडून आलेले आहेत. ते मराठा असून मनोहर सपाटे यांच्यानंतर शहरात मराठा समाजाचा महापौर झाला नसल्याने आता भाजपकडून निष्ठावंत असलेले अनंत जाधव यांना संधी मिळते का हे पाहावे लागेल.

तिसरे आणि महत्वाचे दावेदार हे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आहेत. ते आतापर्यंत दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. या वेळी ते प्रभाग 24 मधून विजयी झाले आहेत. सर्वांत महत्वाचे म्हणजे काळे हे मूळचे भाजपचे निष्ठावंत असून विद्यार्थीदशेपासून ते संघाशी जोडले गेले असल्याने त्यांची दावेदारी मजबूत मानले जाते. याशिवाय दोन्ही दोन्ही देशमुखांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे नरेंद्र काळे यांचे पारडे सध्यातरी जड वाटते.

दरम्यान, महापौरपदासाठी निवड करताना भाजपकडून धक्कातंत्र अवलंबिले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, त्यामुळे चर्चेतील नावे मागे पडून ऐनवेळी नवे नाव पुढे येऊ शकतो, त्यामुळे सोलापूरचे महापौर कोण होणार, याची मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT