Solapur News: राज्यातील 17 पैकी 6 विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपसह महायुतीला यश आलं. पण काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद होऊन अन् प्रचंड जोर लावूनही सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न अपयशी ठरला. अखेरचा डाव तर अगदी धक्कादायक असाच होता.
सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. पुरेसं संख्याबळ पाठीशी असतानाही सोलापूर विधानपरिषदेची ही निवडणूक बार्शीच्या राऊतांसाठी सोपी नसल्याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रचंड अलर्ट मोडवर असून एक ना अनेक डाव 'बिनविरोध'साठी टाकण्याचं काम सुरू असल्याचं दिसून येत आहे.
सोलापूरच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. दरम्यान,काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर काहीकाळ सोलापूरची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चिन्हे दिसू लागले होते. पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या 'इगो'नं बिनविरोधची शक्यता मावळली. व सोलापूर विधानपरिषद स्थानिक मतदारसंघात अखेर निवडणूक लागली.
मात्र, आता सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फक्त सोलापूरच नव्हे तर राज्य भाजपकडूनही जोरदार प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोहिते पाटलांना कॉल केला होता.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोटात सोलापूर विधानपरिषदेसाठी दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जोरदार हालचालीही सुरू झाल्या होत्या. पण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून मोहिते पाटलांना बिनविरोधसाठी कॉल किंवा निरोप गेला नसल्याचं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
सोलापूर विधानपरिषदेच्या स्थानिक मतदारसंघाचा मागचा इतिहास पाहता या निवडणुकीत काहीही होऊ शकतं असं बोललं जात आहे. त्याचमुळे भाजपकडे मोठं संख्याबळ असतानाही ही निवडणूक भाजपसाठी नक्कीच म्हणावी तितकी सोपी नसणार आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपनं सोलापूर विधानपरिषदेसाठी अखेरचा मोठा डाव टाकल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या वसंत नाना देशमुख यांचे व्याही आणि भाजप खासदार उज्जल निकम यांच्यामार्फत 'बिनविरोध'साठी जाळं टाकण्यात आल्याची खळबळजनक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उज्ज्वल निकमांनी केलेल्या जोरदार प्रयत्नानंतर कुठेतरी सोलापूर निवडणुकीत बिनविरोधची आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही अनुकूल होते.पण भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचा थेट संवाद झाला नसल्यानं बिनविरोधची शक्यता मावळली,आणि ही निवडणूक लागल्याची माहिती समोर येत आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाची निवडणुकीत नवा संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीत अखेरच्या क्षणी मुलाला उमेदवारी मागे घ्यावी लागण्यावरुन माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी थेट मोहिते पाटलांवरच केसानं गळा कापल्याचा गंभीर आरोप केला आहे.
जानकरांनी माझ्या मुलाची उमेदवारी मोहिते पाटलांनीच फायनल केली होती.पण काल दोन ते अडीचच्या दरम्यान वसंतराव देशमुख मोबाईल फोन स्विच ऑफ करुन 'नॉट रिचेबल' झाले.हा एकप्रकारे मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला अशा प्रकारचीच भूमिका त्यांची राहिल्याचं म्हटलं होतं.
तसेच ज्यांच्या मागे त्याच्या तालुक्यात एकही मत नाही,जिल्हा परिषदेचा उमेदवार ज्यांना निवडून आणता आला नाही,अशा वसंतराव देशमुखांना उमेदवारी मोहिते पाटलांनी का दिली,असा सवालही उपस्थित केला होता.त्याचमुळे उत्तमराव जानकरांनी या निवडणुकीसह मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जानकरांवर आरोपांवरउत्तमराव जानकर हा माझ्या घरातला प्रश्न आहे, तो आम्ही घरात बसून सोडवू, असं स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोणत्याही भाजप नेत्याचा आपल्याला फोन आला नसल्याचंही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलं.
आम्ही ही निवडणूक सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 616 मतदारांची जी इच्छा होती, ती पूर्ण करण्यासाठी लढवतोय असंही ते म्हणाले. तसेच वसंत देशमुख हे मोहिते पाटील आणि सुधाकर पंत परिचारक यांच्या नेतृत्वात तयार झालेले आहेत.पंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी देशमुख हे काल स्मृतीस्थळावर गेले होते, त्यात काय चुकीचे आहे. माझ्या मागे 600 अदृश्य मतं आहेत.ती अदृश्यशक्ती माझ्या मागे आहेत.निकालादिवशी सर्व दिसणार असल्याचा खळबळजनक दावाही मोहिते पाटलांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.