Uttam Jankar-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : "मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला... फसवणूक केली" : मुलाला डावलताच उत्तमराव जानकरांचे गंभीर आरोप

MLC Election : सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत मतभेद उघड झाले आहेत. उत्तमराव जानकर यांनी वसंतराव देशमुखांना विरोध करत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

Hrishikesh Nalagune

MLC Election : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत उभी फूट पडली आहे. सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी यापूर्वीच भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाही देशमुख उपस्थित होते.

अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना त्यांच्याच पक्षातून विरोध होत आहे. आधी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि आता माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी देशमुख यांना जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. इतकंच नाही तर यावेळी जानकर यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरही केसाने गळा कापल्याचा आणि फसवणुकीचा आरोप केला आहे.

काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतला आणि त्यांच्यामागे ठामपणे उभेही आहेत. पण याच उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातूनच विरोध होताना दिसत आहे.

मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला :

मोहिते पाटील यांच्यावर आरोप करताना जानकर म्हणाले, या निवडणुकीमध्ये माझा चिरंजीव जीवन जानकर यांची उमेदवारी होती. अचानक शेवटच्या टप्प्यात वसंत नानांची उमेदवारी ठेवणं आणि माझी उमेदवारी डावलणं हे माझा केसानं गळा कापण्यासारखं आहे. मोहिते पाटलांनी आमचा केसाने गळा कापला. मोहिते पाटलांनी ही फसवणूक केलेली आहे.

वसंत नानांची उमेदवारी म्हणजे निवडणूक बिनविरोध सोडण्यासारखी आहे. निवडणूक बिनविरोध सोडण्याचं कारण काय? किंवा निवडणूक करतोय हे दाखवण्याचं तरी कारण काय? अशा पद्धतीने या राजकारणाचा मोहिते पाटलांनी खेळखंडोबा केलाय. मोहिते पाटील भाजपला मॅनेज झाले का? यावर प्रश्नावर मात्र जानकर यांनी मौन बाळगले.

एक तर निवडणूक मोहिते पाटलांनी लढावी, नसेल तर मी निवडणूक लढण्यासाठी तयार होतो शेवटच्या क्षणाला आमचाच फॉर्म राहणार आहे, आमचाच फॉर्म ठेवणार आहोत, वसंत नानांचा फॉर्म काढून घेणार आहे अशी व्हूवरचना ठरली होती. अचानक वसंत नानांची उमेदवारी ठेवणं आणि मला माघार घ्यायला लागणं हे मानहानीकराक आहे, असे जानकर म्हणाले.

सगळ्यांनाही माहिती आहे की वसंत नाना या जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवू शकतात का? त्यांनी महिन्यापूर्वी आपला पंचायत समितीचा सदस्य भारतीय जनता पार्टीला दिला. त्यामुळे आम्ही वसंत नानांच्या विरोधामध्ये या निवडणुकीमध्ये आहोत. सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, उत्तमराव जानकर जर निवडणुकीमध्ये असते तर निवडणूक कोणत्या टोकाला गेली असती, कशा पद्धतीने लढाई झाली असती.

मी, अभिजीत पाटील, नारायण पाटील, राजू खरे किंवा बाबासाहेब देशमुख या पैकी महाविकास आघाडीतील वसंतराव देशमुख यांच्यासोबत असणारा एकही आमदार दाखवा. एकही आमदार आमदार जर सोबत नसेल तर मग ही निवडणूक होणार कशी आणि वसंत नाना निवडणुकीचे उमेदवार होऊ शकतात का? असा सवालच जानकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT