Solapur Lok Sabha Constituency : LokSabha Election 2024  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur LokSabha Constituency : मठाधिपती ते खासदार; राजकारणासाठी अध्यात्माची वाट बदलणारे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी!

Solapur Political News : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांचा पराभव जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केला.

Anand Surwase

Lok Sabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे लिंगायत समाजाचे धर्मगुरू आणि अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठातील मठाधिपती आहेत. शांत, संयमी स्वभाव आणि अध्यात्माचा पगडा असलेले खासदार शिवाचार्य हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाल्यापासूनच चर्चेत आले होते. कारण, साधू-संतांचे संसदेत काय काम, अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी संसदेत असे कोणते काम असते जे साधू-संत करू शकत नाहीत, असा प्रतिप्रश्न करीत निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला होता.

2019 त्या निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांना मिळालेल्या विजयामुळे त्यांच्या नावाचा अधिकच गवगवा झाला. परंतु, अध्यात्माची वाट बदलून राजकारण करणाऱ्या धर्मगुरूंची खासदारकी मात्र निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या बनावट जात प्रमाणपत्रामुळे अल्पावधीतच वादाच्या भोवऱ्यात सापडली. (Latest Marathi News)

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. उच्चशिक्षित असलेल्या जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी निवडणूक आयोगाकडे बेडा जंगम जातीचा बनावट दाखला सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला हा बनावट असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे त्यांच्यावर 2020 मध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. परिणामी, त्यांची खासदारकी अडचणीत आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

उच्च न्यायालयाने खासदार महास्वामींचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत रद्द करण्याचा जात पडताळणी समितीने घेतलेला निर्णयच रद्द केला. पुन्हा एकदा जात पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी आणखी कालावधी जाणार आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट ठेवण्यात यश मिळवलेल्या खासदार जयसिद्धेश्वर यांना त्यांची टर्म पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. असे असले तरी त्यांच्या या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत ब्रेक लागण्याचे संकेत त्यांच्या पक्षाकडूनच देण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जयसिद्धेश्वर महास्वामी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. मात्र, भाजपकडून जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा पत्ता कट करून नवीन उमेदवराला संधी देण्याचा तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.

नाव (Name)

नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ ऊर्फ डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

जन्मतारीख (Birth date)

1 जून 1955

शिक्षण (Education)

एम. ए. पीएच. डी. (बनारस विद्यापीठ)

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जन्म वळसंग (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुबसय्या हिरेमठ, तर आईचे नाव रुद्रम्मा असे होते. लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलेल्या जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पुढे गौडगाव मठाचे मठाधिपती म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण वेळ अध्यात्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीच दिला होता.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

गौडगाव धर्मपीठाचे मठाधिपती, शैक्षणिक संस्था आणि राजकारण

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

सोलापूर

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भारतीय जनता पार्टी

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे राजकारणात येण्यापूर्वी अध्यात्माच्या क्षेत्रात कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली असून ते सोलापूरचे विद्यमान खासदार म्हणून कार्यरत आहेत. 2019 पूर्वी त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नव्हती.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे धार्मिक आणि सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या गौडगाव संस्थानचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत. लिंगायत समाजाचे ते धर्मगुरू आहेत. धर्मगुरू म्हणून त्यांनी लिंगायत समुदायासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. जयसिद्धेश्वर महास्वामी हे स्वत: उच्चशिक्षित असल्याने त्यांनी शिक्षणाचा आणि धर्माच्या प्रसारावर अधिक भर दिला आहे. यासाठी त्यांनी अक्कलकोट येथे बी. बी. ए. (Bachelor of Business Administration) आणि बी. सी. ए. (Bachelor in Computer Application) महाविद्यालय सुरू केले आहे. गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्राची स्थापना केली आहे. गौडगाव येथे मागासवर्गीय वसतिगृह, सांस्कृतिक केंद्र, जगद्गुरू पंचाचार्य प्रशाला, प्राथमिक मराठी शाळा, सोलापुरातील शेळगी येथे शिवयोगीधाम हे आध्यात्मिक केंद्र सुरू केले आहे. याशिवाय महास्वामी हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये अध्यात्मावर आधारित प्रवचने देऊन समाजात धार्मिक आणि सामाजिक जागृती घडवण्याचे काम करतात. तसेच गौडगाव मठाच्या वतीने प्रतिवर्षी सिद्धश्रीरत्न पुरस्काराचे वितरणदेखील केले जाते. याशिवाय सोलापूरचे खासदार म्हणून स्वामींनी मतदारसंघातील रस्ते, धर्मस्थळे, समाजमंदिरे, शैक्षणिक संस्थाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत त्यांच्यासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर होते. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा विजय झाला होता, तर सुशीलकुमार शिंदे यांना सलग दुसऱ्या वेळी पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत जयसिद्धेश्वर महास्वामी यांना 5 लाख 15 हजार 798, तर शिंदे यांना 3 लाख 60 हजार 738 मते मिळाली होती. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकाची 1 लाख 58 हजार 887 मते मिळाली होती.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तत्कालीन खासदार शरदकुमार बनसोडे यांचा पत्ता कट करत जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली होती. भाजपच्या अंतर्गत वादातून जयसिद्धेश्वर महास्वामी यांना लोकसभा उमेदवारीची लॉटरी लागली होती. या निवडणुकीत जयसिद्धेश्वर महास्वामींचा बहुमताने विजय झाला होता. याचे कारण म्हणजे सोलापूर या मतदारसंघात लिंगायत, मागासवर्गीय आणि मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्यातच अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि शहरातील लिंगायत मतदारांची संख्या विचारात घेता भाजपने या मतांवर डोळा ठेवत गौडगाव मठाचे मठाधिपती आणि लिंगायत समाजाचे धर्मगुरू असलेल्या जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी दिली होती. तसेच बहुतांश लिंगायत समाज हा पूर्वीपासूनच भाजपच्या विचारसरणीचा आहे. त्याचा फायदा जयसिद्धेश्वर महास्वामींना निश्चितच झाला.

याचबरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण आणि उत्तर या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचेच आमदार होते. तर यापूर्वी 2014 मध्ये मोदीलाटेत भाजपकडे आलेल्या या मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीतही त्या लाटेचा प्रभाव जनमतावर कायम असल्याचे दिसून येत होते. याचाच फायदा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी घेतला आणि मोदींच्याच नावाचा आणि चेहऱ्याचा प्रचारासाठी वापर केला. त्यामुळे सोलापूरकरांसाठी नवख्या असलेल्या जयसिद्धेश्वर महास्वामींच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात यापूर्वी काँग्रेसचे खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून म्हणावा तसा विकास झालेला नव्हता. त्यामुळे मतदारांना बदल हवा होता. तो बदल 2014 च्या मोदीलाटेत मतदारांनी घडवून आणला होता. त्यानंतर 2019 मध्ये तत्कालीन खासदार शरद बनसोडे यांच्या कामावर मतदार नाराज होता, असे असले तरी मतदारांचा केंद्रातील मोदी सरकारवरचा विश्वास कायम होता. त्यामुळे या निवडणुकीत जयसिद्धेश्वर महास्वामींना मतदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकार केला.

तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, या निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकरांनीदेखील सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे या निवडणुकीत मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला. परिणामी, जयसिद्धेश्वर महास्वामी हे शिंदेंपेक्षा तब्बल दीड लाख अधिक मते घेऊन विजयी झाले. या निवडणुकीत शिंदे यांना 3 लाख 60 हजार 738 मते मिळाली होती. तसेच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकाची 1 लाख 58 हजार 887 मते मिळाली होती. भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांना 5 लाख 15 हजार 798 मते मिळाली होती. म्हणजेच या ठिकाणी वंचितच्या उमेदवारीचा जयसिद्धेश्वर यांना फायदाच झाला होता.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

जयसिद्धेश्वर महास्वामी हे लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत. त्यामुळे राजकारणात येण्याआधीपासूनच त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. गौडगावचे मठाधिपती म्हणून जयसिद्धेश्वर महास्वामी मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू या भाषांमधून प्रवचने देत असतात. गौडगाव मठाच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक कार्यासोबत शैक्षणिक कार्यातही योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्याशी लिंगायत, पद्मशाली समाजातील मोठा भक्तवर्ग जोडला गेला आहे. असे असले तरी सोलापूरसारख्या विस्तृत लोकसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, मंगळवेढा या तालुक्यात जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जनसंपर्क म्हणावा तितका रुजलेला दिसत नाही.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी आहेत. सोशल मीडियाच्या वापराबाबत ते सजग असून त्यांचे महत्त्व ते ओळखून आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ते नेहमीच ॲक्टिव्ह असल्याचे दिसून येतात. जयसिद्धेश्वर महास्वामी हे आपल्या एक्स आणि फेसबूक खात्यावरून मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती शेअर करत असतात. मात्र, त्यांच्या सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या विकासाच्या कामाची प्रसिद्धी क्वचितच केली जात असल्याचे दिसून येते.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

जयसिद्धेश्वर महास्वामी हे एक शांत, संयमी, आध्यात्मिक आणि उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांचे वक्तृत्व हे प्रभावी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य होण्याची शक्यता कमीच आहे. असे असले तरी 2019 च्या निवडणुकीवेळी त्यांनी केलेले 'तुळजापूर, पंढरपुरातील देव तुम्हाला पावणार नाही, कारण तुमचा बोलणारा देव मी आहे,' हे वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या या वक्त्यव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. निवडणुकीच्या प्रचारावेळी मतदानाचे आवाहन करत असताना महास्वामी म्हणाले होते की, निवडणूक काळात मतदानासाठी सुट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदारांनी गावाला, देवाला तसेच सहलीला जाण्याचा बेत आखू नये. तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला तरी देव भेटणारही नाही आणि बोलणारही नाही. देवाला गेलात तरी पुण्य मिळणार नाही, तुमचे पैसे विनाकारण खर्च होतील. कारण तेथे तुमचा देव नाही, तर तुमचा बोलणारा देव मी आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावून तुम्ही पुण्य करा, असे वादग्रस्त विधान महास्वामी यांनी केले होते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

कोणीही नाही

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

जयसिद्धेश्वर महास्वामी हे गौडगाव मठाचे मठाधिपती आणि लिंगायत समाजाचे धर्मगुरू असल्याने त्यांचा अनुयायीवर्ग मोठा आहे. त्यांच्यासाठी ही मोठी जमेची बाजू मानली जाते. तसेच जयसिद्धेश्वरस्वामी हे उच्चशिक्षित असून त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठामधून एमएचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगु या भाषांवर प्रभुत्व असल्याने त्यांचा जनसंपर्कामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यांनी आपल्या मठाच्या वतीने स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून गरजूंसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून दिली आहेत. त्यामुळे समाजात त्यांच्या कार्याची सकारात्मक चर्चा केली जाते. तसेच मागील 5 वर्षांपासून त्यांनी खासदार निधी देऊन ग्रामीण भागातील विकासकामांना गती दिली आहे. त्याचाही फायदा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

जयसिद्धेश्वर महास्वामी हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. मात्र 2019 च्या निवडणुकीवेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याविरोधात जातपडताळणी समितीनेदेखील त्यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जात प्रमाणपत्र प्रकरण हे स्वामींच्या चांगलेच अंगलट आले आहे. अद्यापही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने स्वामींच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी जात प्रमाणपत्राची केस मोठा अडथळा असल्याचे मानले जात आहे. खासदार म्हणून मतदारसंघात आपल्या कार्याची छाप उमटवण्यात ते अपयशी ठरल्याची चर्चा होत आहे. महास्वामींच्या कामावरून मतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधकांकडून सोलापूरचे खासदार बेपत्ता असल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपकडून त्यांना संधी देण्यापूर्वी जनमताचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

2019 च्या निवडणुकीत मोदी लाटेचा न ओसरलेला प्रभाव आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी धर्मगुरू जयसिद्धेश्वर महास्वामी हे खासदार झाले होते. मात्र बेडा जंगम जातीच्या बनावट दाखल्याच्या प्रकरणामुळे निवडणुकीनंतर एक वर्षातच त्यांची खासदारकी धोक्यात आली होती. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवीन उमेदवाराचा शोध सुरू करण्यात आला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. असे असले तरी खासदार जयसिद्धेश्वर यांनी पुन्हा एकदा आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी दौरेदेखील सुरू केले आहेत. मात्र, बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण हे न्यायालयात असल्याने उमेदवारी मिळण्यास अडथळा निर्माण होणार असल्याची जाणीव स्वत: जयसिद्धेश्वर महास्वामींनाही आहे.

निवडणुकीत त्यांना उमेदवारी अर्ज सादर करत असताना त्यांचे बेडा जंगम या जातीचे जात प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करावे लागणार आहे. मात्र, याआधीच त्यांनी ते पत्र गहाळ झाली असल्याची तक्रार वळसंग पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास अडचणीचे ठरणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षाने जयसिद्धेश्वर महास्वामींचे तिकीट कापल्यास त्यांना पक्षाचा निर्णय मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. त्यामुळे ते भविष्यात राजकारणात पक्ष देईल ती जबाबादारी पार पाडताना दिसून येण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यावर स्वत: महास्वामी यांनी अधिकृत अशी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत जयसिद्धेश्वर महास्वामी यांना तिकीट नाकारले तरी, यावेळीदेखील नवीन चेहऱ्यास संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडून घेतला जाणार असल्याने सोलापूरसारख्या महत्त्वाच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता संपूर्ण राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT