Solapur Politics (1).jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Mahapalika Election: सोलापूर महापालिका निवडणुकीत 'या' 25 जागा गेम फिरवणार; राष्ट्रवादी अन् एमआयएमनं लावली ताकद

NCP Vs AIMIM News : एमआयएमच्या माजी नगरसेवकांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत घेतले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमचे मतदार विरुध्द एमआयएमचे माजी नगरसेवक असाच राजकीय सामना दिसण्याची दाट शक्यता आहे.

प्रमोद बोडके

Solapur News: बहुभाषिकांचे, बहुधर्मियांचे शहर म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते. सोलापूर शहरातील प्रमुख व निर्णायक मानल्या जाणाऱ्या मुस्लिम समाजाची व्होट बँक महापालिका काय निवडणुकीत भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या जवळपास 25 जागांवर मुस्लिम समाजाची मते निर्णायक मानली जातात. सोलापुरातील मुस्लिम (Muslim) बहूल भागात एमआयएम व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मोठी चुरस दिसण्याची शक्यता आहे.

सोलापुरातील प्रभाग 14, 17, 20 व 21 या ठिकाणी मुस्लिम मतांची संख्या सर्वाधिक आहे. विजापूर वेस, नई जिंदगी, शास्त्रीनगर, मौलाली चौक असा हा साधारणत: भाग असून या भागात मुस्लिम मतांची संख्या प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे या ठिकाणी जवळपास सर्वच प्रमुख पक्ष मुस्लिम उमेदवाराला मैदानात उतरवितात. या शिवाय प्रभाग 8, 11 व 13 या ठिकाणीही मुस्लिम समाजाची मते दुसऱ्या क्रमांकावर असून विजयासाठी ही मते निर्णायक मानली जातात.

2012 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी या संपूर्ण भागावर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसची सत्ता डोळे झाकून येत होती. सोलापूर (Solapur) शहराच्या राजकारणात 2014 च्या विधानसभा निवडणुकीतून एमआयएमचा प्रवेश झाला. एमआयएमने विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत 37 हजार 138 मते घेतली.

त्यानंतर 2017 च्या महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 9 नगरसेवक विजयी झाले होते. सोलापुरच्या राजकारणात एमआयएम आल्यापासून त्याचा थेट परिणाम काँग्रेसवर होताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीत एमआयएम फॅक्टर किती चालणार? यावर या भागाचा निकाल अवलंबून असेल.

एमआयएमच्या माजी नगरसेवकांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत घेतले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमचे मतदार विरुध्द एमआयएमचे माजी नगरसेवक असाच राजकीय सामना दिसण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक रणनितीची जबाबदारी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यावर असणार आहे.

एमआयएमकडून महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांच्यावर असणार आहे. विधानसभा निवडणुकीत एमआएमला मिळालेल्या ६१ हजार मतांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढला आहे.

विरोधक म्हणूनही काँग्रेस धोक्यात

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याने त्याचा मोठा परिणाम काँग्रेसवर झाल्याचे मानले जात आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांना सत्तेतील पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा पर्याय मोकळा झाला आहे.

सेक्युलर विचार जपायचा आहे आणि विकासकामांसाठी सत्ताही हवी आहे, अशा कार्यकर्त्यांना भाजप, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस हा चांगला पर्याय मानला जात आहे. भाजपचा विरोधक म्हणून सोलापुरच्या राजकारणात असलेली पॉलिटिकल स्पेस आता राष्ट्रवादी घेताना दिसत आहे. विरोधक म्हणूनही काँग्रेसची जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT