Solapur Politics : Babanrao Avatade
Solapur Politics : Babanrao Avatade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : बाजार समिती निवडणूक ; मंगळवेढ्यात बबनराव अवताडेच ठरणार किंगमेकर!

हुकूम मुलाणी

Solapur Politics : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंगळवेढा तालुक्यातील 18 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे (Babanrao Avatade) हेच या निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहेत. या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) व समविचारी गटाची भूमिका महत्त्वाची ठरणारी असली, तरी तिचे पडसाद आगामी निवडणुकीवर दिसून येणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गत निवडणुकीत बबनराव अवताडे यांच्या नेतृत्वाखाली 18 पैकी सर्वच जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. पाच वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक उपक्रमातून आर्थिक लाभ झाला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या, परंतु राज्य प्राधिकरणाने प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे या निवडणुका घेण्याची निश्चित केले. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अवताडे कुटुंबात राजकीय कलह निर्माण झाला. भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांनी निवडणूक लढवली.

मात्र या निवडणुकीनंतर बबनराव आवताडे व सिद्धेश्वर अवताडे यांनी आपला राजकीय ट्रेंड बदलत अनेक घटकाशी संपर्क ठेवत पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केला.आमदार गटाशी तुल्यबळ विरोधी गट म्हणून बांधणी करण्यात त्यांनी यश मिळवले. मात्र दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत निर्माण झालेल्या समविचारीआघाडीने बबनराव अवताडे यांना डावलल्याने समर्थकांनी समविचारी आघाडीवर रोष व्यक्त केला.

दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार निश्चिती करण्यापासून ते अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बबनराव अवताडे यांनी मोठ्या कौशल्याने हाताळले. कारण दामाजीच्या निवडणुकीत 'दूध पोळल्या'मुळे बबनराव आवताडे यांनी आपले राजकीय कौशल्य पणाला लावले. तर आमदार समाधान आवताडे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बैठक घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करून, समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

दरम्यान, दोन्ही अवताडे परिवाराने एकत्र यावे अशी भूमिका नुकतीच समर्थंकाकडून मांडण्यात आली. तर दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला अपेक्षित यश मिळाल्यामुळे, त्यांनाही या निवडणुकीत यश मिळेल या, दृष्टिकोनातून उमेदवारी अर्ज दाखल केले. विरोधकांनी ऐनवेळी तयारी केल्याने सहकारी संस्थेच्या निवडणुकीतील बबनराव अवताडे यांच्या अनुभवावर विरोधक आजमितिला अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे.

सहकारी संस्था मतदार संघातील 11 जागा, व्यापारी मतदारसंघातील दोन व हमाल तोरण मतदारसंघातील एकाजागेवर बबनराव अवताडे यांचा गट सहज विजय हस्तगत करेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे या निवडणुकीत बबनराव अवताडे हे सत्ता स्थापन करू शकतील अशी परिस्थिती आहे तर व्यापारी मतदारसंघातील अर्ज हे त्यांचेच आहेत, हमाल तोलार मतदारसंघातील एक जागा व आर्थिक दुर्बल (ग्रामपंचायत) एक जागा या चार जागा सध्या बबनराव आवताडे यांनी ताब्यात येण्याच्या मार्गावर आहेत.

उद्या अर्ज मागे घेण्याची अंतिम दिवस आहे त्यामुळे बबनराव अवताडे यांच्याबरोबर कोण एकत्र येणार व विरोधात कोण टाकणार की निवडणूक बिनविरोध होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.मात्र या निवडणुकीचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही

(BY - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT