Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : पंढरपूर विधानसभेसाठी भाजपचे 2 गट इच्छुक असतानाच शिंदे गटानेही लावली फिल्डिंग!

Solapur Politics, Assembly Election 2024 : शिवसेना गटाचे नेते अनिल सावंत यांनी देखील पंढरपूर विधानसभा लढवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. मात्र, आधीच भाजपच्या दोन गटांनी या मतदारसंघावर दावा केल्यामुळे शिंदेंच्या वाट्याला तो येणार का?

हुकूम मुलाणी

Solapur News, 10 August : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) दृष्टीने सर्वच पक्षांनी राज्यातील मतदारसंघाची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूचे जागावाटप हे सहजासहजी होणार नाही.

कारण घटकपक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असल्यामुळे एका पक्षाच्या उमेदवाराला तिकीट दिल्यास अन्य दोन पक्षातील इच्छुकांची नाराजी पक्षप्रमुखांना ओढवून घ्यावी लागणार यात शंका नाही. अशातच आता भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते अनिल सावंत यांनी देखील पंढरपूर विधानसभा लढवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

मात्र, आधीच भाजपच्या (BJP) दोन गटांनी या मतदारसंघावर दावा केल्यामुळे शिंदेंच्या वाट्याला तो येणार का? की सावंत वेगळी वाट शोधणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तालुक्याच्या दक्षिण भागात आरोग्यमंत्री तानाजी सावंत, अध्यक्ष शिवाजीराव सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी भैरवनाथ युनिट 3 साखर कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व ऊस गाळपाचा प्रश्न मार्गी लावला आहे.

मात्र, कारखानदारी बरोबरच त्यांनी भोसे जिल्हा परिषद गटातील विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाद्वारे आपले राजकीय कार्यक्षेत्र वाढविण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते भोसे जिल्हा परिषद गटाचे संभाव्य उमेदवार असण्याची चर्चा रंगली होती. पण जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे ती चर्चा थांबली. अशातच राज्यात सत्तांतर झालं आणि तानाजी सावंत यांची आरोग्यमंत्री म्हणून वर्णी लागली.

आणि त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचा (Shivsena) गट बांधण्यास सुरुवात केली. त्या दृष्टीने तालुक्यातील आरोग्य सेवेला वाव देण्यासाठी आरोग्यसेवेशी संबंधित अनेक कामे मंजूर केली. यात नंदेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूरीचा स्वतंत्र आदेश काढला. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्याचा हेतू स्पष्ट झाला होता. तर या मतदारसंघातून आमदार समाधान आवताडे हे भाजपचे संभाव्य दावेदार मानले जातात. मात्र, सध्या भाजपचे प्रशांत परिचारक यांनी देखील आपल्या गटाला निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

या दोन उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच आता अनिल सावंत यांनी देखील चाचपणी करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाला सुरुवात केली. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढल्यास यश मिळेल का? स्वतंत्र लढल्यास निवडून येऊ शकतो का? कोणत्या पक्षाची उमेदवार यशस्वी होईल? शिवाय कोणाबरोबर युती करणं फायदेशीर ठरेल, यासह अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी हे सर्वेक्षण सुरु आहे.

त्यामुळेच आता ते देखील या निवडणुकीच्या रिंगणत उतरण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या ते शिवसेना शिंदे गटात आहेत. शिवाय महायुतीत ही जागाही भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना सध्या तरी भाजप उमेदवाराचा प्रचार करावा लागणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र, तरीही स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर काय करायचं या दृष्टीने त्यांनी तयारी करण्यासाठीच हे सर्वेक्षण सुरु केल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT