Praniti shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Airlines Issue : ‘चॅलेंज देऊन सांगते, सोलापूरची विमानसेवा आणखी सहा महिने सुरू होणार नाही’

श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी एवढ्या घाईत पाडण्यात आली की, दुसऱ्या दिवशी सोलापूरला लगेच विमानसेवा सुरू करण्यात येणार होती. चिमणी पाडण्यासाठी आर्मीला बोलावण्यात आले होते. त्या गावाला अक्षरशः छावणीचं रूप आले होते.

विश्वभूषण लिमये

Solapur, 23 March : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी एवढ्या तातडीने पाडण्यात आली की दुसऱ्या दिवशीच विमानसेवा सुरू होणार होती. मात्र, मी चॅलेंज देऊन सांगते की आणखी 6 महिने तरी सोलापूरची विमानसेवा हे सुरू करणार नाहीत, अशा शब्दांत आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विमानसेवेवर भाष्य केले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना तिकीट जाहीर झाले आहे. त्या गेल्या महिनाभरापासून प्रचार करत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथील कॉर्नर सभेत बोलताना आमदार शिंदे यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) चिमणीवरून (Chimany) झालेल्या राजकारणावर टिप्पणी केली. तसेच, भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी कॉर्नर सभांचा धडाका लावला आहे. होनमुर्गी येथील सभेत त्यांनी सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यावर टीका केली. मागील दहा वर्षांत भाजपने सोलापूरसाठी काय केलं? एक जरी योजना त्यांनी सांगितली, तरी मी खाली बसेन. सोलापूरचे खासदार हे किती वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आहेत. ते एकदम निष्क्रीय आहेत, असा टोला त्यांनी खासदार महास्वामींना लगावला.

आमदार शिंदे म्हणाल्या, वैयक्तिक राजकारणामुळे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली. कारखान्याची ती चिमणी एवढ्या घाईत पाडण्यात आली की, दुसऱ्या दिवशी सोलापूरला लगेच विमानसेवा सुरू करण्यात येणार होती. त्याचवेळी चिमणी पाडण्यासाठी तिथे आर्मीला बोलावण्यात आले होते. त्या गावाला अक्षरशः छावणीचं रूप आलेले होते.

मी चॅलेंज देऊन सांगते की, आणखी 6 महिने जातील तरीपण हे विमानसेवा सुरू करणार नाहीत. पंतप्रधान, खासदार, मंत्री सर्व त्यांचेच असताना ही एक छोटी विमानसेवा सोलापूरला भाजपवाले देऊ शकले नाहीत, असेही विधान शिंदे यांनी केले.

दरम्यान, मोदी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्येकाच्या बॅंक खात्यात अद्याप 15 लाख रुपये जमा झालेले नाहीत. शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नाही. उज्ज्वला योजनेतून सिलिंडर दिले जाते आणि सिलिंडर घेत असल्यामुळे पिवळं कार्ड बंद करतात. धान्यच नाही, तर खायचं काय..? 300 रुपयांचा गॅस सिलिंडर 1200 रुपयांवर जाऊन पोहाेचला, तरी तुम्ही भाजपला मतदान करता, असा सवाल प्रणिती यांनी गावकऱ्यांना विचारला.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT