Solapur, 28 March : सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2003-2004 मध्ये एकाच वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम पाहिले आहे. एकाच जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असण्याची बहुधा महाराष्ट्रातील ती पहिली वेळ असावी. राज्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेल्या या मातब्बर राजकारण्यांच्या वारसांना आता अस्तित्वासाठी निकराची लढाई लढावी लागत आहे. मोहिते पाटील आणि शिंदे यांची पुढची पिढी घराण्याचा लौकिक पुन्हा निर्माण करणार का, असा सवाल लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि विजयसिंह मोहिते पाटील (Vijayshinh Mohite Patil) यांचे एकेकाळी सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व होते. त्या दोघांचा राजकीय दबदबा होताच, त्याशिवाय सर्वच स्तरावर त्यांच्या शब्दाला मान होता. या दोघांनी एकाच वेळी राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी, तर उपमुख्यमंत्री म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांनी हाकला; परंतु त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना, तर सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेच्या सलग दोन निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यावर एकहाती सत्ता गाजवली. पण, सध्या या दोन्ही घराण्याचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे. त्यांच्यानंतर जिल्ह्यात जे नवे नेतृत्व तयार झाले, त्यांनी जिल्ह्याच्या विकासाला गती देताना पाणीप्रश्न, बेरोजगारी, उद्योगधंदे, प्रकल्पांवर काम करणे अपेक्षित होते. मात्र, त्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. ठोस नेतृत्व नसल्याने जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक भाजपचे आमदार असतानाही मंत्रिपदासाठी प्रतीक्षा करावी लागते. पालकमंत्री तर गेल्या पाच वर्षांपासून बाहेरचाच मिळालेला आहे. पाच वर्षांत पाच पालकमंत्री सोलापूरवर लादण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाचा निधी खर्च करताना प्रत्येक वेळी जिल्ह्याला वेगवेगळा अनुभव आला, त्यामुळे नेतृत्वाअभावी सध्या जिल्ह्याची राजकीय घडी विस्कटली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लाखाचे मताधिक्य दिले. त्यांना माढ्यातून लोकसभेच्या तिकिटात डावलण्यात आलेले आहे. मोहिते पाटील यांनी बंडाची भाषा केल्यानंतरही भाजप नेतृत्वाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय माढ्यात फेरजुळवणी करण्याचे प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहेत. दुसरीकडे मोहिते पाटील यांनी राजकीय अस्तित्वाच्या लढाईमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू आहेत.
दुसरीकडे, सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दाेन निवडणुकांमध्ये पराभव झाला. वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यावर पुन्हा राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने वारसदार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. यात ते यशस्वी होतात की नाही, हे पाहावे लागेल.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.