Somnath Vaidya  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Election 2024 : दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सोमनाथ वैद्य भाजपकडून इच्छुक, शहराध्यक्ष काळेंकडे दिला अर्ज

Somnath Vaidya : गेल्या 19 वर्षापासून प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असलेले स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Solapur News: स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून भाजपच्या माजी सभागृह नेत्यासह सहा नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना अधिकृत अर्ज दिला.

गेल्या 19 वर्षापासून प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असलेले स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका लावला आहे.

दरम्यान, ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर रविवारी ( 15 सप्टेंबर ) सोमनाथ वैद्य यांनी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज सादर केला. अर्जाबरोबरच त्यांनी कार्यअहवाल दिला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, अनिल चव्हाण, श्रीनिवास पुरुड, अशोक बिराजदार आदी उपस्थित होते.

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच प्रशासकीय पातळीवर कामाचा प्रचंड मोठा अनुभव असलेला नवा चेहरा म्हणून सर्व परिचित झालेले सोमनाथ वैद्य यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी यासाठी माजी नगरसेवकांनी पाठिंब्याचे शिफारस पत्र दिले आहे. या शिफारस पत्रासह अहवालासोबत सोमनाथ वैद्य यांनी भाजपचे शहराध्यक्ष काळे यांच्याकडे इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दिला आहे.

वैद्य यांचा अर्ज प्रदेशाध्यक्षांकडे पाठविणार : नरेंद्र काळे

सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी रितसर अर्ज माझ्याकडे दिला आहे. शिफारशीही जोडल्या आहेत. त्यांचा अर्ज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ बोर्डाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली.

भाजपचे माजी नगरसेवक आणि सरपंचांची आग्रही मागणी

"दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मी भाजपकडून निवडणूक लढवावी यासाठी विविध घटकांकडून आग्रही मागणी होत आहे. भाजपच्या सुमारे 12 नगरसेवकांनी लेखी व तोंडी पाठिंबा दर्शवला आहे. त्यापैकी सहा जणांनी लेखी शिफारसही दिली आहे. त्याचबरोबर या मतदारसंघातील अनेक सरपंचही, तशी मागणी करीत आहेत. मला भाजपने उमेदवारी दिल्यास निवडून आणू, असा निर्धार अनेक जण व्यक्त करत आहेत," असं वैद्य यांनी सांगितले.

'या' माजी नगरसेवकांनी दिले शिफारस पत्र

सोमनाथ वैद्य यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी द्यावी यासाठी भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी नगरसेविका वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड, राजश्री अनिल चव्हाण, संतोष भोसले, जुगनबाई अंबेवाले, राजश्री अशोक पाटील - बिराजदार यांनी शिफारस पत्र दिले आहे. हे शिफारस पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT