Solapur, 15 September : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोहोळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत माने यांची उमेदवारी माजी आमदार राजन पाटील यांनी महिनाभरापूर्वीच घोषित केली आहे, त्यामुळे मोहोळचा महायुतीचा उमेदवार ठरला आहे. महायुतीचे उमेदवार माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार, याची उत्सुकता आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत अख्खा मोहोळ तालुका ढवळून काढणाऱ्या अनगर अप्पर तहसील कार्यालय आणि भूमिपुत्राचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. महिनाभरापर्यंत राष्ट्रवादीला सर्वाधिक सुरक्षित वाटणारा मोहोळ मतदारसंघ सध्या अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून अडचणीत आला आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळाली होती. वास्तविक मोहोळमध्ये महाविकास आघाडीकडे एकही महत्त्वाचा नेता नसतानाही प्रणिती शिंदे यांना मिळालेले मताधिक्य हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे मोहोळमधून (Mohol) महाविकास आघाडीकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे.
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शिव स्वराज्य यात्राही मोहोळ मतदार संघात आली होती. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे, त्याच मदारसंघात ही शिवस्वराज्य यात्रा काढली जात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे येण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय क्षीरसागर हे उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार मानले जातात. माजी आमदार रमेश कदम यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. तसेच, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजीत ढोबळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारीची मागणी केली आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजू खरे हेही निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.
मोहोळ मतदारसंघातून सध्या भूमिपुत्राचा विषय चर्चेला जात आहे. याचा फायदा संजय क्षीरसागर यांना होऊ शकतो. मात्र, क्षीरसागर कसे डावपेच आखतात, यावरच राजकीय गणिते अवलंबून आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या तुतारीचाही फायदा संजय क्षीरसागर होऊ शकतो. मात्र ही सर्व गणिते उमेदवारी मिळाल्यानंतरची आहेत.
अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरूनही मोहोळमध्ये राजकारण पेटले आहे. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत अखेर अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू केले आहे. मात्र त्या कार्यालयाला तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्याचा प्रचंड विरोध असून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
वास्तविक, मागील काही महिन्यांपर्यंत मोहोळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी सर्वाधिक सुरक्षित मानला जात होता. मात्र, अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून उठलेले विरोधाचे वादळ अद्याप शमला तयार नाही. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही यशवंत माने यांना विरोध दर्शविला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या यशवंत मानेंना ही निवडणूक सोपी नक्कीच नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.