संदीप गायकवाड
Solapur, 28 March : सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मागील काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. बाजार समितीच्या प्रशासकपदी मोहन निंबाळकरांची नियुक्ती, त्यानंतर उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती ताजी असतानाच सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (दूध पंढरी) संचालक मंडळाच्या बरखास्तीला स्थगिती देऊन संघाचा कारभार पुन्हा संचालकांच्या हाती देण्यात आला आहे. ही स्थगिती देतानाही मोठे राजकारण झाल्याचे पुढे आले आहे. ही स्थगिती व्हाया ‘फलटण’मार्गे ‘टेंभुर्णी’ ते मुंबई झाल्याची चर्चा आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील सरकारमध्ये असणाऱ्या बड्या नेत्याचा त्याला विरोध असूनही भावनिक डाव टाकल्यामुळे स्थगिती मिळल्याची चर्चा रंगली आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या (Solapur Dudh Sangh) संचालक मंडळाची बरखास्ती हा विद्यमान अध्यक्षांसह संचालक मंडळासाठी मोठा धक्का होता. एकीकडे विधानसभा निवडणुकीतील पराभवाची सल आणि दूध पंढरीवरील अधिकार गेल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी जोरदार हालचाली केल्या. दूध संघावरील प्रशासक हटवून ‘त्या’ ठिकाणी संचालकांना पुन्हा अधिकार मिळावेत, यासाठी त्यांचा खटाटोप सुरू होता.
दूध संघाच्या प्रशासक मंडळातील किमान अधिकारी तरी बदलण्यात यावेत, यासाठी प्रयत्न झाले. मात्र, त्यात यश येत नव्हते. त्यामुळे या बड्या नेतेमंडळींची अस्वस्थता वाढत होती. त्यामुळे दूध संघावर पुन्हा कब्जा मिळविण्यासाठी ‘फलटण’मार्गे (Phaltan) प्रयत्न सुरू करण्यात आले. कारण, तोच एकमेव पर्याय समोर होता. त्या माध्यमातून जोरदार हालचाली झाल्या.
व्हाया ‘फलटण’ टेंभुर्णी ते मुंबईतील हायकमांड हे प्रयत्न अखेर यशस्वी ठरले. त्या नेत्याने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, पाच मार्च रोजी दिलेला बरखास्तीचा आदेश रद्द करण्यात आला आणि व्हाया ‘फलटण’ टेंभुर्णी ते मुंबई हा प्रयत्न फलादायी ठरला.
मधल्या काळात संबंधित नेत्यांनी आपल्या हायकमांडकडून प्रशासक मंडळ हटविण्यासंदर्भात प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यास हायकमांडने ठाम नकार दिल्याचीही माहिती आहे. या सर्व प्रयत्नांत भावनिक खेळी खेळली गेल्याची चर्चा आहे, त्यातून हा प्रयत्न यशस्वी ठरल्याची खमंग चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, ज्या सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कृती समितीने ‘दुग्ध विकास’चे विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. तीच कृती समिती प्रशासकाला हटवून संचालक मंडळाच्या हाती कारभार देण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे. यासंदर्भात कृती समितीचे अनिल आवताडे म्हणाले, मुंबईच्या सहनिबंधकांनी प्रशासक रद्द करून संचालक मंडळास दिलेला अधिकार याच्या विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार आहेत. न्यायालयात आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास आवताडे यांनी व्यक्त केला आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.