Sujay Vikhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sujay Vikhe Sabha : भर पावसात सुजय विखेंनी वातावरण तापवलं; लंकेंना दिला मोठा इशारा

Sunil Balasaheb Dhumal

Ahmednagar Political News : राज्यात लोकसभा निवडणुकीचा तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफाही थंडावल्या आहेत. या सांगता सभांत अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. मात्र या पवासाला न जुमानता महायुतीतील नेत्यांनी सभा गाजवल्या. दक्षिण नगरचे उमेदवार सुजय विखेंनी भर पावसात आघाडीच्या नीलेश लंकेंना इशारा देत नगर जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापवलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला असतानाच अवकाळी पावसाने सभांना ब्रेक दिला आहे. काही सभांत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सुजय विखेंची Sujay Vikhe सभा सुरू असताना अचानकच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. वादळाने मंडपही कोसळला. या पावसाने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यावेळी त्यांनी पावसापासून संरक्षण होण्यासाठी चक्क खुर्च्याच डोक्यावर धरल्या. अशा वातावरणात सुजय विखेंचा जोश चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळाले.

जोरदार पावसात झालेली सुजय विखेंची सभा आता नगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. नीलेश लंके Nilesh Lanke यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, नगर जिल्ह्याला 50 वर्षांहून अधिक काळ विखे पाटील कुटुंबाने सुसंस्कृत राजकारणाचा वारसा दिला आहे. आता या जिल्ह्यात कोणी भाषणांतून पोलिसांचा अपमान करत असेल, कोणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माता-भगिनींचे डोकी फोडत असेल, कोणी शिवीगाळ करत असेल, तर त्या माणसाला गाडायचे की नाही?, असा प्रश्न विखेंनी विचारला. त्यास कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद देत हो असे उत्तर दिले. यावेळी भर पावसात सभेत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, दक्षिण नगरमधून महायुतीतील भाजपचे उमेदवार सुजय विखे विरुद्ध महाविकास आघाडीतील शरद पवार Sharad Pawar गटाचे निलेश लंके यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे. विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभा घेतल्या आहेत. तर दुसरीकडे लंकेंच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आघाडीतील अनेक नेत्यांनी सभा घेतल्या. आता या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. आता येथील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून नगरमधून कोण बाजी मारणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT