Pune, 12 October : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना धोबीपछाड देत तब्बल सात जागांवर विजय मिळविला आहे. उर्वरीत जागांवर राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार हे मोठ्या आघाडीवर आहेत. लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनलचे प्रमुख असलेल्या जगताप यांच्यासह त्यांच्या प्रमुख शिलेदारांना मतदारांनी नाकारले आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस २१ विरुद्ध ० अशा फरकाने जगताप आणि शरद पवार यांच्या पॅनेलला क्लीन स्वीप देणार हे आता निश्चित झाले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ब गटातून विजयाची घोडदौड सुरू केली आहे. ती सर्वसाधारण गटातील मतदारसंघाच्या मतमोजणीही कायम ठेवली आहे. आतापर्यंत २१ पैकी सात जागांवर या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. यात ब गटातील एक, तर सर्वसाधारण गटातील सहा जागांचा समावेश आहे.
निंबुत-खंडाळा गटातील तीनही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाली आहेत. विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये सरासरी सहा हजार मतांचा मोठा फरक दिसून येत आहे. या गटातून अभिजित काकडे, प्रमोद काकडे आणि वसंतराव दगडे हे विजयी झाले आहेत.
मुरूम-वाल्हे गटातून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप निवडणूक लढवत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले हेाते. सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान संचालक तथा माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी पुरुषोत्तम जगताप यांना अस्मान दाखवत 6464 मतांनी पराभव केला आहे. शिंदे यांना १३९३५ मते घेतली असून जगताप यांना ७३२६ मते मिळाली आहेत.
शिंदे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे विक्रम भोसले आणि ऋषिकेश गायकवाड हे विजयी झाले आहेत. विक्रम भोसले यांना १३७९०, तर ऋषिकेश गायकवाड यांना १३८६२ मते मिळाली आहेत. भोसले आणि गायकवाड यांनी जगताप पॅनेलचे वैभव गायकवाड आणि सतिश संकुठे यांचा दणदणीत पराभव केला आहे.
सध्या सर्वसाधारणमधील गट क्रमांक तीन होळ मोरगाव मतदासंघाची मतमोजणी सुरू असून त्या गटातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीनही उमेदवार आघाडीवर आहेत. त्यांचे मताधिक्य तब्बल 7 हजारांपर्यंत कायम राहील, अशी सध्याची परिस्थिती आहे.
दरम्यान, ब वर्ग गटातून संग्राम सोरटे यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आतापर्यंत सात जागांवर या पॅनेलने बाजी मारली आहे. उर्वरित जागांवरही सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलच पारडे जड असल्याचे चित्र आहे.
जगतापांना नाकारले
पुरुषोत्तम जगताप यांनी तब्बल ३५ वर्षे संचालक म्हणून, तर त्यातील १३ वर्षे अध्यक्ष म्हणून कारखान्याची धुरा सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात सोमेश्वर कारखान्याने राज्यभरात नावलौकिक मिळवला. कारखान्याने १३ मानाचे पुरस्कार पटकावले, तर उच्चांकी उसदर देण्याची परंपरा जपली. एवढा प्रदीर्घ अनुभव असूनही जगताप यांना सभासदांचा विश्वास टिकवता आला नाही. ऐनवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी फारकत घेऊन वेगळा पॅनल थाटल्याने त्यांना नाकारल्याचे बोलले जात आहे.
जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले पुरंदरचे भाजप नेते आणि माजी आमदार संजय जगताप, सुदाम इंगळे आणि माणिक झेंडे यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा निकाल केवळ एका पॅनेलच्या पराभवापुरता मर्यादित न राहता, सोमेश्वरच्या सहकारातील नेतृत्वाला दिलेला धक्का मानला जात आहे.
पुरंदरचा कऱ्हाकाठही कामी आला नाही
पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलची प्रमुख भिस्त पुरंदर तालुक्यातील सभासदांवर होती. कऱ्हा या ठिकाणावरून भाजप नेते आणि माजी आमदार संजय जगताप यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, या भागातही अपेक्षित पाठिंबा मिळाला नसल्याचे निवडणुकीच्या निकालातून दिसत आहे. बारामती आणि पुरंदरमधील सभासदांनी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिल्याचे दिसून येत आहे.
विरोधी पॅनेलला एक जागा मिळणेही मुश्कील
सोमेश्वरच्या निकालात सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने आतापर्यंत सात जागा जिंकल्या आहेत. उर्वरित जागांवरही राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यासह आघाडीवर आहेत. विरोधातील पॅनेलला एकही जागा मिळणार नसल्याचे सध्या मतमोजणीतील कलावरून दिसून येते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या २१-० च्या निकालावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.