Sushilkumar Shinde-Dharmaraj Kadadi-Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sushilkumar Shinde : ‘सोलापूर दक्षिण’मध्ये काँग्रेसने डाव टाकला; ठाकरेंना धक्का देत शिंदेंकडून अपक्ष काडादींना पाठिंबा जाहीर

Solapur South assembly elections 2024: सुशीलकुमार शिंदेंनी दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा इतिहास सांगून शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली, असा दावा केला आहे. त्यामुळे अखेर मतदानाच्या दिवशी काँग्रेसने काडादींच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 20 November : सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेस पक्षाने अखेर आपले पत्ते ओपन केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेस पक्षाचा अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. तो जाहीर करताना सुशीलकुमार शिंदेंनी दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा इतिहास सांगून शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली, असा दावा केला आहे. त्यामुळे अखेर मतदानाच्या दिवशी काँग्रेसने काडादींच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT)उमदेवार अमर पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले हेाते. मात्र, काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने हेही इच्छूक होते. काँग्रेसच्या यादीत त्यांचे नावही होते. मात्र, त्यांना शेवटपर्यंत एबी फार्म देण्यात आला नाही, त्यामुळे त्यांनी माघार घेत काडादींना पाठिंबा दिला होता.

महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या प्रचारातही काँग्रेस (Congress) सहभागी झाली नव्हती. खुद्द उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून खासदार प्रणिती शिंदे यांना शिवसेनेचा प्रचार करण्याचे आवाहन केले होते. मात्र, शिंदे कुटुंबीयांसह काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रचारात उतरले नव्हते. आज तर शिंदेंनी अपक्ष उमेदवार काडादी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेनेचे अमर पाटील यांच्या अडचण वाढली आहे.

महाविकास आघाडीकडून अमर पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदे कुटुंबीयांनी महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे.

काडादींसारखा शांत स्वभावाचा नेता, जो सर्वांचे समजून घेऊन ऐकून घेऊन काम करणार नेता आहे. त्यांना चांगले भविष्य आहे. मानेंना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा एबी फार्म मिळू शकला नाही, त्यामुळे त्यांनी काडादींना पाठिंबा दिला होता. मतदारसंघात चांगले वातावरण आहे, असा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केला.

ते म्हणाले, या निर्णयातून मेसेज वगैरे काही नाही. शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे. मुख्यमंत्र्यांची निवडणूक मी दोन वेळा याच मतदारसंघातून लढवली आणि दोन्ही वेळा जिंकली होती. आमचे आनंदराव देवकाते अनेक वर्षे निवडून आलेले होते. त्यामुळे हा मतदारसंघ तसा काँग्रेस आहे. शिवसेनेचा उमेदवार एक वेळ कधीतरी निवडून आला, त्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर मतदारसंघ केला आणि ते चुकीचे आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही. हे शिवसेनेचे लोक समजू शकतात, हे आम्ही शिवसेना नेत्यांच्या लक्षात आणून दिलं आहे. तसेच, खुद्द उद्धव ठाकरेंना आम्ही समजून सांगितले आहे. सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून शिवसेनेकडून चुकून त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे विजय होतील, असा विश्वास प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीत महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहेत, ज्या पद्धतीने पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे, त्याच पद्धतीने सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्येही लढत होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT