Kolhapur Gokul Politics  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Gokul Politics : 'गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांना 'सर्वोच्च' धक्का; जुन्या कंत्राटदारांना मोठा दिलासा...

Kolhapur Gokul Politics News : जुन्या कंत्राटदारांवरून सतेज पाटलांचा महाडिक गटावर निशाणा ..

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर दूध उत्पादक सहकारी संघ (गोकुळ) संघात सत्तांतर झाल्यानंतर जुन्या कंत्राटदारांची कंत्राटी रद्द करण्याचा निर्णय नवनियुक्त संचालक मंडळाने घेतलेला आहे. या नव्या निर्णयाविरोधात कंत्राटदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी लवाद स्थापन करण्याची मागणी कंत्राटदाराने केली होती. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, सत्ताधाऱ्यांना धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गट विरुद्ध महाडिक गट असा संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. (Latest Marathi News)

सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या जुन्या कंत्राटदारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची जबाबदारी ही लवादावरच असेल, असा स्पष्ट निकाल दिल्याने सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेचा बुरखा फाटला आहे. कंत्राटदारांनी उच्च न्यायालयात लवाद स्थापन करण्याची मागणी केल्यानंतर कंत्राटदारांच्या मागणीला सत्ताधाऱ्यांनी विरोध केला होता.

कोणतेही कंत्राटी रद्द करण्याचा अधिकार दूध संघाला असल्याचा युक्तिवाद उच्च न्यायालयात करण्यात आला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी लवाद स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर गोकुळने जुन्या कंत्राटदारांना दुधाचा पुरवठा करावा, असे हे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात गोकुळ दूध संघाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही गोकुळ दूध संघाला खडेबोल सुनावत उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

जुन्या कंत्राटदारांवरून सतेज पाटलांचा महाडिक गटावर निशाणा -

गोकुळच्या आतापर्यंतच्या राजकारणात माजी पालकमंत्री आणि आमदार सतेज पाटील यांनी नेहमीच महाडिक गटाला टार्गेट केले आहे. सातत्याने गोकुळच्या ठेकेदार आणि कंत्राटदार यांच्यावरून महाडिक गटांवर आरोप केले आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात पै-पाहुण्यांना गोकुळ दूध संघात ठेका देतात, असाही आरोप करण्यात आला होता.

शौमिका महाडिक यांचा पलटवार -

माजी पालकमंत्री आणि आमदार सतेज पाटील यांच्या आरोपांना गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी वेळोवेळी प्रत्युत्तर दिले आहे. सतीश पाटलांना गोकुळमधील ज्ञान फारसे नाही. त्यांना केवळ महाडिकांचा ठेका, एवढ्यापुरतेच ज्ञान मर्यादित असल्याचा पलटवार शौमिका महाडिक यांनी केला होता.

विरोधकांची कायदेशीररित्या बाजू भक्कम -

गोकुळच्या कारभाराविरोधात आणि लेखापरीक्षणाच्या विरोधात विरोधकांनी सातत्याने सत्ताधाऱ्यांवर बोट ठेवले आहे. गैरकारभाराच्या विरोधात विरोधकांनी न्यायालयाचे दारदेखील ठोठावले आहे. त्यात अनियमितता आढळल्याने न्यायालयानेदेखील विरोधकांच्या बाजूने कौल दिला आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेदेखील जुन्या कंत्राटदारांच्या बाजूने कौल दिल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष वाढणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT