Supporters of former MLA Suresh Halvankar prepare for a massive political strength show in Ichalkaranji. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ichalkaranji Politics : भाजपमध्ये पुन्हा ठिणगी! बॅकफूटवर टाकलेले सुरेश हाळवणकर ताकद दाखवणार, कार्यकर्तेही इरेला पेटले!

Suresh Halvankar Vs Rahul Awade : विरोधी पक्षपेक्षा इचलकरंजीतील भाजप नेते माजी आमदार सुरेश हाळवणकर गटाला भाजप नेते आमदार राहुल आवडे गटासोबत संघर्ष करावा लागत आहे.

Rahul Gadkar

Suresh Halvankar News : महाविकास आघाडीलातील संघर्षाला तोंड देण्याऐवजी इचलकरंजीतील भाजप नेते माजी आमदार सुरेश हाळवणकर गटाला भाजप नेते आमदार राहुल आवडे गटासोबत संघर्ष करावा लागत आहे. अशातच विधानपरिषदेची शब्द देऊनही वरिष्ठाकडून बेदखल करणाऱ्या हाळवणकर गटाला महापालिकेतही सन्मान जनक वागणूक मिळत नाही. त्यामुळे इरेला पेटलेला माजी आमदार सुरेश हाळवणकर गट आता इरेला पेटला आहे.

माजी आमदार हाळवणकर यांचा येत्या २ जूनला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. वस्त्रनगरीच्या राजकीय पटलावरील सतत चर्चेत राहिलेले माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे समर्थक पुन्हा एकदा एकवटणार आहेत.

भाजपअंतर्गत आवाडे व हाळवणकर असे दोन शक्तिशाली राजकीय गट आहेत. त्यांच्यात असलेला अंतर्गत कलह लपून राहिलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर हाळवणकर गटाकडून सुरू असलेल्या या हालचालीतून नेमका कोणता व कोणाला संदेश द्यायचा आहे, याबाबत मात्र राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढत आहे.

यापूर्वी हाळवणकर यांनी मोठ्याने वाढदिवस कधीही साजरा केलेला नाही. पण, यावेळी मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. त्यांचे समर्थक या निमित्ताने एकत्र येऊन वाढदिवसाची जय्यत तयारी करीत आहेत. त्याची जोरदार चर्चा वस्त्रनगरीत सुरू झाली आहे.

हाळवणकर यांचा विधान परिषदेवरील नियुक्तीचा विषय प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांची निवड निश्चित समजली होती. तशी त्यांच्या समर्थकांकडून जय्यत तयारी केली होती. अनेक वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. पण, त्यांना पुन्हा नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवले आहे. त्यांची नियुक्ती का झाली नाही, याबाबत शहरात उलट-सुलट चर्चा बरेच दिवस सुरू होती.

संघर्ष तीव्र होणार

इचलकरंजी महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. पण, तेथे आवाडे-हाळवणकर गट यांच्यात आता उघडपणे संघर्ष सुरू झाला आहे. नुकत्याच एका विषयाच्या मंजुरीवरून दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे सत्तारूढ गटातील बेदिली उघड झाली होती, तर एका भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्तानेही या दोन्ही गटातील संघर्ष ताणला होता. या संघर्षामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळत आहे. यातून पुढील काळात महापालिकेच्या राजकारणात काही नवीन तर घडणार नाही ना, याचीही धाकधूक सत्तारूढ गटात आहे.

हाळवणकर गट मजबूत होणार

निमित्त वाढदिवसाचे असले तरी, हाळवणकर गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याचे स्पष्ट संकेत समाजमाध्यमातून मिळत आहेत. त्यामुळे पुढील काळात आवाडे-हाळवणकर गटातील राजकीय संघर्षाला आणखीन धार निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमधील काहीजण अलीकडे निष्क्रिय झाले होते, त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून पुन्हा एकदा भाजपमधील हाळवणकर गट मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT