

Vijay Wadettiwar News: राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच आता नगरसेवकांच्या ‘मोर्चेबांधणी’ला वेग आल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या बालेकिल्ल्यातच मोठी राजकीय घडामोड घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ब्रह्मपुरी मतदारसंघातील सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि काही महत्त्वाचे नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. एवढंच नाही तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल ६० हून अधिक नगरसेवक संपर्काबाहेर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता वाढली असून भाजपने मोठी खेळी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांची मतं निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदाराला जपण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. अशातच भाजपचे चिमूरचे आमदार बंटी भांगडिया ( Bunty Bhangdiya) यांच्या संपर्कात काँग्रेसचे अनेक नगरसेवक असल्याची माहिती समोर येत आहे.
हे नगरसेवक अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची चर्चा असून उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच भाजपने मोर्चेबांधणी सुरू केल्याचं बोललं जात आहे. अधिकृत उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नसतानाच सुरू झालेल्या या घडामोडींमुळे पूर्व विदर्भातील विधान परिषद निवडणूक यंदा अत्यंत रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
विशेष म्हणजे ही संपूर्ण घडामोड वडेट्टीवार यांच्या बालेकिल्ल्यात घडली असल्याने हा त्यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. भाजपने वेळेआधीच मतदारांची तटबंदी सुरू केल्याने आता काँग्रेससमोर आपले नगरसेवक एकत्र ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.