Solapur News : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (ता. २० ऑक्टोबर) मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणारे पाटील यांच्या भेटीमुळे शिंदे यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे का? की आमदार प्रणिती शिंदे यांच्या खासदारकीसाठी पेरणी आहे, अशी चर्चा मोहोळसह सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. (Sushilkumar Shinde meet former MLA Rajan Patil)
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अनगर येथील वाड्यावर जाऊन राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पाटील परिवाराच्या वतीने लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील यांनी शिंदेंचे स्वागत केले. या वेळी त्यांच्या समवेत अश्विनी हॉस्पिटलचे बिपिनभाई पटेल, काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात येत आहे. मागील दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून त्यांच्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यानंतर आता काँग्रेसही लोकसभेच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे असून, सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरू आहे. त्यातही सोलापूर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्या नावाचा ठरावही करण्यात आलेला आहे. त्यांनीही पक्षाने आदेश दिल्यास आपणही तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाला रिंगणात उतरवतात, याकडे सोलापूरचे लक्ष आहे.
मोदी लाट असतानाही २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत राजन पाटील यांनी मोहोळ मतदारसंघ जिंकून त्याची बांधणी किती मजबूत केलेली आहे, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे राजन पाटील यांना वगळून सोलापूर लोकसभा मतदारसंघ जिंकणे तसे अवघड गणित आहे, त्यामुळेच पाटील हे सर्वांना हवेहवेसे असतात.
उमेदवारी खुद्द शिंदेंना मिळो आणि प्रणिती यांना मात्र काँग्रेसने लोकसभेची तयारी केल्याचे आजच्या भेटीतून स्पष्ट होत आहे. या भेटीतही सुशीलकुमार शिंदे यांनी मोहोळ मतदारसंघाबाबतची राजकीय परिस्थिती जाणून घेतली. राजन पाटील यांची भेट घेत शिंदेंनी लोकसभेची जुळवणी सुरू केली आहे, हे मात्र नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.