Atul Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Atul Bhosale : अतुल भोसलेंच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला; म्हणाले, उदयसिंह पाटलांची उमेदवारी फिक्स, पण माझं थोडं पुढं-मागं...’

Satara Dcc Bank Election 2026 : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत उदयसिंह पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरले. उंडाळकरांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना भोसले यांच्या उमेदवारीवर संभ्रम कायम आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 01 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी कराड सोसायटी मतदारसंघातून ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी, तर कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला. यातील उंडाळकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, डॉ. भोसले यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढला आहे. खुद्द आमदार भोसले यांनी ‘माझ्या उमेदवारीबाबत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह महायुतीतील नेत्यांशी चर्चा करून निर्णय होईल. थोडं मागं पुढं सरकण्याची आमची तयारी आहे,’ असं विधान केल्यामुळे संभ्रम आणखी वाढला आहे.

सातारा जिल्हा बॅंकेसाठी कराडमधून उंडाळकर आणि भोसले गट एकत्र आला आहे. ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांना भोसले यांनी कराड सहकारी सोसायटी मतदारसंघातून पाठिंबा दिला आहे. मागील निवडणुकीत भोसले आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यात युती होती. आता उंडाळकर आणि भोसले एकत्र आल्याने सहकारातील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दुसरीकडे, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनीही फलटण सहकारी सोसायटी मतदारसंघाबरोबरच कृषी उत्पादन आणि प्रक्रिया संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. फलटणच्या राजकीय डावपेचातून रामराजेंनी डाव टाकल्याचे मानले जात आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी भाजपचे अतुल भोसले यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांनी अर्ज भरलेल्या कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था गटातूनही उमेदवारी अर्ज भरला आहे, यामागे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भोसलेंच्या उमेदवारी अर्जाबाबत मोठी उत्सुकता आहे.

दरम्यान, आपल्या उमेदवारी अर्जाबाबत आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तीनही पक्षांचे नेते चर्चा करून कोणाचे अर्ज ठेवायचे, हे निश्चित करतील, चर्चेतून अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय झाला, तरच माझा अर्ज कायम ठेवला जाईल. थोडे पुढे मागे सरकायची वेळ आली तरी तीही तयारी आम्ही ठेवली आहे.

कराड सोसायटी गटातून ॲड. उदयसिंह पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. कृषी उत्पादन व प्रक्रिया मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या मतदारसंघातून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचाही अर्ज आहे. त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेता येईल. ते शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी चर्चा करुन अर्ज ठेवायचा की मागे घ्यायचे ते ठरविले जाईल, असेही भोसले यांनी नमूद केले.

ते म्हणाले, जिल्हा बॅंकेची ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून सामोरे जायचे आहे, असे सांगून डॉ. अतुल भोसले म्हणाले, महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते उमेदवारी अंतिम करण्याबाबत चर्चा करतील. सगळ्यांचा विचार घेऊन निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय करण्यात आला आहे. जिल्हा बॅंकेचे मतदार हे जिल्ह्यातील शेतकरी आहेत. त्यांच्या विकासासाठी सर्वांच्या विचारातून पुढे जाता येईल.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीवेळी ॲड. उदयसिंह पाटील व आम्ही सहकारात एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोसायटी गटातून उदयसिंह पाटील यांचा अर्ज भरलेला आहे. माझ्या अर्जाचे काय होणार हे पक्ष पातळीवर ठरविले जाईल. पण, ॲड. उदयसिंह पाटील हे फिक्स उमेदवार आहेत, असेही अतुल भोसले यांनी सांंगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT