

Karad, 01 October : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडच्या राजकारणाला गेली पाच दशके आकार देणारे भोसले-उंडाळकर गटांच्या राजकीय संघर्षाला आता नवी किनार मिळाली आहे. तब्बल एका तपानंतर ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि आमदार डॉ. अतुल भोसले हे एकाच राजकीय पटलावर एकत्र आले आहेत. सहकाराचे राजकारण करणाऱ्या भोसले-उंडाळकर गटांच्या नव्या राजकीय समीकरणाचे दर्शन जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने घडले.
दरम्यान, कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीनंतर सहकाराच्या राजकारणात एकत्रित वाटचालीचा घेतलेला निर्णय आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्षात उतरल्याने कऱ्हाडच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीला विशेष महत्त्व आहे.
माजी सहकार मंत्री (स्व) विलासराव पाटील-उंडाळकर आणि ज्येष्ठ नेते (स्व.) जयवंतराव भोसले यांच्या राजकीय काळापासून भोसले-उंडाळकर गटांचा राजकीय प्रवास संघर्ष आणि सहकार्याच्या दोन्ही छटांनी पुढे आला आहे. विधानसभा, कृष्णा साखर कारखाना, बाजार समिती यांसह विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांत दोन्ही गट कधी एकत्र तर, कधी आमनेसामने उभे ठाकले आहेत. या संघर्षातून कऱ्हाडच्या राजकारणाचे स्वतंत्र ध्रुवीकरण निर्माण झाले. पुढील काळातही दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष कायम राहिला. मात्र, सहकार क्षेत्रातील बदलती राजकीय गणिते आणि संस्थांवरील प्रभावाचे महत्त्व लक्षात घेता दोन्ही गटांनी आता संघर्षाऐवजी समन्वयाचा मार्ग स्वीकारल्याचे दिसत आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी एकत्र येत सहकार क्षेत्रात संयुक्तपणे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सातारा जिल्हा सहकारी बँक, बाजार समिती आणि अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही एकत्रित भूमिका घेण्याचे संकेत मिळाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही राजकीय जवळीकतेला आता प्रत्यक्ष स्वरूप आले आहे.
ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी सातारा जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे तब्बल १२ वर्षांनंतर दोन्ही गटांचे प्रमुख चेहरे एकाच राजकीय प्रक्रियेत खांद्याला खांदा लावून उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या घडामोडीचे महत्त्व केवळ दोन नेत्यांच्या एकत्र येण्यापुरते मर्यादित नाही. कऱ्हाडच्या सहकार क्षेत्रात दोन्ही गटांची स्वतंत्र संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यामुळे या दोन राजकीय प्रवाहांची जुळवाजुळव झाल्यास आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकांतील पारंपरिक मतविभाजनाच्या गणितावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः जिल्हा बँक ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची संस्था असल्याने तिच्या निवडणुकीतील राजकीय आघाडीला व्यापक अर्थ प्राप्त झाला आहे.
दरम्यान, आमदार डॉ. भोसले यांनी निवडणूक महायुती म्हणून लढविली जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उमेदवारीसंदर्भात निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारीसाठी थोडे मागे-पुढे सरावे लागले तरी, आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
ॲड. उंडाळकर यांचा सोसायटी गटातील अर्ज निश्चित असल्याचे सांगतानाच, स्वतःच्या उमेदवारीबाबत पक्षीय पातळीवर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सूचित केले. त्यामुळे अंतिम उमेदवारीचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी एका तपाचा राजकीय दुरावा संपवून दोन्ही गट पुन्हा एकत्र आल्याचा संदेश मात्र स्पष्ट झाला आहे.
दोन लाखांची बोली लावून ठराव विकत घेणारे जगताप उंडाळकरांचे सूचक
कऱ्हाड तालुक्यातील कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीची संचालक मंडळाच्या बैठकीत जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावासाठी बोली लावण्यात आली होती. त्यात विक्रमसिंह संभाजीराव जगताप यांनी दोन लाख रुपयांची बोली लावून हा मताचा अधिकार मिळवला होता. विक्रमसिंह जगताप हे जिल्हा बॅंकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ॲड. उंडाळकर यांना सूचक झाल्याचे पाहायला मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.