raju_shetti sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : राजू शेट्टी यांनी चळवळ विकली? तिकीट कापल्यानंतर 'स्वाभिमानी' जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

Hatkanangle Assembly Constituency 2024 : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिली आहे.

Mangesh Mahale

Kolhapur News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन माजी आमदारांना गळाला लावल्यानंतर स्वाभिमानीच्या चळवळीतील खंदे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून चळवळीला बळ देत असलेल्या कार्यकर्त्यांनाच बळ मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील नाराजी गेल्या वर्ष दोन वर्षापासून समोर येत आहे.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आम्ही चळवळ टिकवण्याचे काम केले. सातत्याने विधानसभा निवडणुकीत आम्ही राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली असताना आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

केवळ चळवळ टिकली पाहिजे म्हणून आम्ही ज्या त्यावेळी गप्प रहाणे पसंत केले. मात्र या विधानसभा निवडणुकीला माझी उमेदवारी जवळपास निश्चित झाली असताना माजी आमदारांना सोबत घेऊन त्यांना उमेदवारी दिली. चळवळीतील कार्यकर्त्यांचा हा घातच आहे, अशी टीका करत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत माजी खासदार राजू शेट्टी यांची हुकुमशाही सुरू आहे. चळवळीसाठी आम्ही अनेक गुन्हे अंगावर घेतले आहेत. आमची प्रत्येक दिवाळी पोलीस स्टेशनला गेली. माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः शेट्टी आले होते. मात्र एका रात्रीत असं काय झालं? त्यानंतर मला संपर्कच केला नाही. जिल्हाध्यक्षांना विचारात न घेता त्यांनी हा निर्णय केला कसा? असा सवाल जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी उपस्थित केला.

राज्यात परिवर्तन महाशक्ती उद्यास येताना त्याचा फायदा शेतकरी संघटनेच्या चळवळीला होईल अशी भाबडी आशा आमच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना होते. मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजू शेट्टी यांची दिशा बदलली आहे. त्यांनी चळवळ विकण्याचं काम सुरू केलं आहे असा आरोप वैभव कांबळे यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्याकडे ते राजीनामा सुपूर्त करणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT