Jalgaon Election: दिवाळीत मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांना शुभेच्छा देत उमेदवारांचा प्रचार सुरु आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रभाकर सोनवणे हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रचारासाठी ते चोपडा येथून सकाळी १० वाजता ममुराबादला जात होते. त्यावेळी रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या सोनवणे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे.
डॉक्टरांनी सोनवणे यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सोनवणे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समजल्यानंतर रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात नातेवाईक, मित्रमंडळी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रभाकर सोनवणे यांची प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली असून ते लवकरच प्रचारात सक्रीय होतील, अशी माहिती त्यांचे पुत्र दिनेश सोनवणे यांनी पत्रकारांना दिली.
विधानसभेच्या चोपडा मतदारसंघात महा विकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे पक्षाकडून राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा एक दिवस बाकी असतानाच ही उमेदवारी प्रभाकर सोनवणे यांना देण्यात आली.
लता सोनवणे या चोपडा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. चोपड्याची जागा महायुतीला सुटली आहे. लता सोनवणे यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना महायुतीने मैदानात उतरवलं आहे. त्यांचा सामना प्रभाकर सोनवणे यांच्याशी होत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.