Solapur, 03 April : माढा तालुक्यातील अंजनगाव येथील खेलोबा मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सलग तिसऱ्या दिवशी गावात तणावाची परिस्थिती आहे. दोन्ही बाजूकडून ठिय्या आंदोलन सुरू आहे. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार राजन पाटील, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रयत्न करूनही तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, विनापरवाना बसविण्यात आलेला पुतळा हटविण्याचा मागणीवर धनगर समाज ठाम असून पुतळा न हटविण्याबाबत मराठा समाज आक्रमक आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोजणीला विरोध करत अधिकाऱ्यांना हुसकावून लावले.
खेलोबा मंदिर परिसरात प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता रात्रीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा बसविण्यात आला आहे. मंदिर परिसरातील पालखी मार्गावर तो पुतळा बसविण्यात आल्याने धनगर समाजाकडून विरोध होत आहे. तो इतरत्र बसविण्यास आमचा विरोध नाही. पालखी मार्गावर तो बसविण्यात आल्याने यात्रेच्या वेळी पालखीला अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तो स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी देवस्थानचे फरांडेबाबा यांच्या धनगर समाजाकडून होत आहे.
खेलोबा मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या पुतळ्यामुळे निर्माण झालेला तेढ दूर करण्यासाठी आज सकाळपासून प्रशासनाबरोबरच राजकीय पातळीवरून जोरदार प्रयत्न झाले. मात्र, त्याला यश आले नाही. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी सकाळपासूनच प्रयत्न केले. मात्र, पुतळ्याबाबत कोणताही तोडगा निघू शकला नाही.
आमदार पाटील हे मराठा आणि धनगर समाजाशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी मराठा समाजातील तरुणांसोबत चर्चा केली, त्याचबरोबर फरांडेबाबा आणि धनगर समाजातील तरुणांशी चर्चा केली. मात्र, मागे हटायला कोणीही तयार नव्हते. दोन्ही बाजूंकडून तीव्र प्रतिक्रिया येत होत्या. त्यामुळे आमदार पाटील यांचे आजचे प्रयत्नही असफल ठरले.
दुसरीकडे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी प्रयत्न केले. अंजनगावमधील दोन्ही समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तीसमवेत अनगर येथे बैठक झाली. मात्र, त्या बैठकीत मोजणीच्या मुद्यावरही एकमत घडू शकले नाही. त्यामुळे राजन पाटील यांचे प्रयत्न तोडगा काढू शकले नाहीत.
या आजी माजी आमदारांसह जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीही वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले. ते कायदा व सुव्यवस्था सांभाळात दोन्ही समाजात समोपचार घडविण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, त्यांनाही यश येऊ शकले नाही.
दरम्यान, मंदिराकडे येणाऱ्या पालखी मार्गावर छत्रपतींचा पुतळा बसविण्यात आलेला आहे, त्यामुळे पालखीला अडथळा निर्माण होणारा पुतळा स्थलांतरित करण्यात यावा, या मागणीवर खेलोबा देवस्थान आणि धनगर समाज ठाम आहे. दुसरीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्याही परिस्थिती स्थलांरित करण्यात येणार नाही, असा मराठा समाजाचा आग्रह आहे, त्यामुळे तिसऱ्या दिवशी तणाव कायम होता.
मंदिर परिसरातील जागेची मोजणी करण्यासाठी शासकीय अधिकारी घटनास्थळी आले होते. मात्र, विना परवाना बसविण्यात आलेला पुतळा स्थलांतरित करण्यात यावा, असा आग्रह करत लक्ष्मण हाके यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोजणीला विरोध करत अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.