Ahilyanagar Shrirampur : '40 वर्षांपासूनचा तिढा, आता भूमिपुजनाची जागा सोडून दुसऱ्याच ठिकाणी बांधकाम'; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी प्रकरण तापलं
Chhatrapati Shivaji Maharaj statue : श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीचा गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न, मार्गी लागला असला, तरी ठिकाणावरून वाद पेटला आहे. श्रीरामपूरच्या शिवाजी महाराज चौकात पुतळा उभारण्याऐवजी आता जागा बदलून 'नेहरू भाजी मंडई' परिसरात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तसं काम सुरू करण्यात आलं आहे.
पुतळा उभारण्याची जागा बदलण्यावरून श्रीरामपूरमध्ये वादंग निर्माण झाला आहे. भाजप सत्ताधाऱ्यांनी परस्पर घेतलेल्या या निर्णयावरून विरोधकांसह हिंदुत्वादी संघटनांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. यात काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले देखील सहभागी झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा श्रीरामपूर शहरातील शिवाजी महाराज चौकातच उभारण्यात यावा, या मागणीसाठी शिवभक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून जोरदार पाठपुरावा झाला. मात्र, सध्या सत्तेवर असलेल्या भाजप (BJP) सरकारने पुतळ्याची जागा बदलून 'नेहरू भाजी मंडई' परिसरात उभारण्याचा निर्णय घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराज चौकातच पुतळा उभारण्याची दीर्घकालीन मागणी असून, शिवभक्तांच्या भावना त्या ठिकाणाशी निगडीत आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांनी 'मुस्लिम (Muslim) समाजाच्या भावना दुखावू शकतात' या कारणाने मूळ चौकाऐवजी दुसऱ्या ठिकाणी पुतळा उभारण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.
अधिवेशनात प्रश्न मांडणार : आमदार ओगले
या पार्श्वभूमीवर स्थानिक शिवभक्तांनी एक स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून, अनेक नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. विशेषतः काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी या मोहिमेला पाठिंबा देत स्वतः स्वाक्षरी केली. हा विषय ते आगामी विधीमंडळ अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. आपण स्वाक्षरी केली, तोपर्यंत 28 हजार नागरिकांनी महाराजांचा पुतळा चौकातच उभारावा यासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. नागरिकांचा पाठिंबा बघता आपण जनभावनेच्या पाठीशी आहोत, असेही आमदार ओगले यांनी सांगितले.
संभाजी भिडेंच्या आदेशानं स्वाक्षरी मोहीम
दुसरीकडे, भाजपचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मुद्द्यावर मौन बाळगून आहे. त्यावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा न देण्यामागे 'ही मोहीम अमुक-तमुकांच्या सांगण्यावरून चालू आहे' असे कारण दिल्याचे आयोजकांनी सांगितले. यामुळे सामान्य शिवभक्तांमध्ये नाराजीचे आहे. स्वाक्षरी मोहिमेचे आयोजकांनी "ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आणि संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाने सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या आधारे नव्हे, असे सांगितले.
10 मार्च 2024 मध्ये भूमिपूजन
राधाकृष्ण विखे पाटील महसूलमंत्री असताना, महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितमध्ये श्रीरामपूर इथल्या शिवाजी महाराज चौकात 10 मार्च 2024 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं भूमिपूजन झालं होतं. आता परवानगी नसल्याचं कारण देत, गेल्या 40 वर्षांपासून पुतळ्यासाठी सुरू असलेल्या हिंदुत्वावाद्यांचा संघर्षाचं, आता पुतळ्याचा ठिकाण बदलल्यानं नाराजी वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.