Satara, 23 January : पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीमध्ये जोरदार धुसफूस सुरू आहे. रायगडमध्ये त्या धुसफुशीचा स्फोट झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना विशेषतः रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे तीव्र इच्छूक आहेत, त्यासाठी त्यांनी रायगडमध्ये शिवसेनेचे राष्ट्रवादीपेक्षा अधिकचे आमदार आहेत, असे कारण सांगितले आहे. मात्र, तोच न्याय लावयाचं म्हटलं तर साताऱ्यात केवळ दोन आमदार असतानाही शिवसेनेचे शंभूराज देसाई पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेने आखलेली स्ट्रॅटेजी त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. साताऱ्यात त्याची ठिणगी पडली आहे.
विधानसभा निवडणुकीत तब्बल 234 पेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेवर आलेल्या महायुती (Mahayuti) सरकारला निकालानंतर जवळपास दहा ते पंधरा दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर पंधरा दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि खातेवाटप आणि पालकमंत्रिपदाच्या वाटपलाही असाचा कालावधी लोटला. पण, मुख्यमंत्रिपदापासून सुरू झालेली धूसफूस महायुतीमध्ये विशेषतः शिवसेना-भाजपमध्ये अजूनही कायम आहे.
महायुती सरकार सत्तेवर येऊन तब्बल दीड महिन्यानंतर पालकमंत्रिपदाचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री (Guardian Minister) जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागतिक उद्योग परिषदेसाठी दाओसला गेले आहे. मात्र, पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये विस्फोट झाला आणि रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी प्रचंड आग्रही असलेले भरत गोगावले यांनी चक्क आंदोलन केले. महामार्गावर टायर जाळून आंदेालन करण्यात आले.
पालकमंत्रिपदावरून आंदोलन होण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिलीच घटना होती. त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली. रायगडचे पालकमंत्रिपद मागताना शिवसेनेने जिल्ह्यात सर्वाधिक आमदार शिवसेनेचे असल्याचा दाखला दिला आहे.
शिवसेनेचा तो दावा खरा आहे. कारण रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत, तर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या एकमेव आमदार आहेत. तर साताऱ्यात भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. त्यामुळे आमदारांच्या संख्येचा निकष लावला तर रायगडमध्ये भाजपचेही तीन आमदार आहेत. दुसरीकडे साताऱ्यात भाजपचे चार आमदार असूनही पालकमंत्रिपद हे शिवसेनेला देण्यात आलेले आहे, त्यामुळे आमदार संख्येच्या निकषाचा आग्रह शिवसेनेसाठी अडचणीचा ठरू शकतो.
रायगडबरोबरच नाशिकच्या पालकमंत्रिपदालाही स्थगिती देण्यात आलेली आहे. वास्तविक नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सात आमदार असूनही पालकमंत्रिपद मात्र भाजपकडे गेले आहे. नगरमध्येही प्रत्येकी चार आमदार राष्ट्रवादी आणि भाजपचे आहेत. नगरचेही पालकमंत्रिपद हे भाजपकडे गेले आहे, तोच प्रकार शिवसेनेबाबत दिसून येत आहे, त्यामुळे आमदारांच्या संख्याबळाचा निर्णय शिवसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमदारांच्या संख्याबळावरून सातारा भाजपने शिवसेनेवर तोफ डागली आहे. साताऱ्याचे पालकमंत्रिपद हे भाजपला देऊन शिवेंद्रराजेंकडे ते पद देण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा बॅंकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी केली आहे, त्यासाठी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.