Books of great men Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेसला घ्यायचाय राष्ट्रवादीच्या आमदाराचा अभ्यास वर्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांना काँग्रेस, भाजप, शिवसेना व मनसे नेते टीकेचे लक्ष्य करत आहेत.

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - अहमदनगर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळील शिवाजी महाराज पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांना काँग्रेस, भाजप, शिवसेना व मनसे नेते टीकेचे लक्ष्य करत आहेत. अशातच आता काँग्रेसचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे ( Kiran Kale ) यांनी संग्राम जगताप यांच्यावर दररोज नवीन आरोपांचे सत्र सुरूच केले आहे. ( The Congress wants to take the study class of the NCP MLA )

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लोकार्पण सोहळा हा सकल हिंदू समाजाने आयोजित केला होता. मात्र या सोहळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ताबा घेतला तसेच अश्लील गाण्यांवर नृत्य करत धिंगाणा घातला, असे आरोप विरोधकांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी संग्राम जगताप यांना छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांवरील पुस्तके भेट दिली आहेत. तसेच महापुरुषांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला काँग्रेसने आमदारांना दिला आहे.

काँग्रेसने ही भेट कुरियरद्वारे आमदारांच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या आवारात असणाऱ्या संपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवली आहे. यामध्ये गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता ? इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?, शिवछत्रपती - एक मागोवा या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचा समावेश आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांवरील 'छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ' काँग्रेसने त्यांना दिला आहे.

महामानव, घटना शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेल्या 'माझी आत्मकथा' हे पुस्तक काँग्रेसने आमदारांना उपलब्ध करून दिले असून यामध्ये आंबेडकरांचे निवडक संपादित लेख आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या 'शेतकऱ्याचा आसूड' त्याचबरोबर फुले यांचा अतिशय गाजलेला 'गुलामगिरी' हा ग्रंथ देखील काळे यांनी आमदारांना वाचनासाठी उपलब्ध करून दिला आहे.

महापुरुषांवरील साहित्यरुपी भेट देत असताना काळे यांनी आमदारांना जाहीर आवाहन केले आहे की, आपण एक महिन्यासाठी दररोज दोन तासांचा वेळ मला द्यावा. मी काँग्रेसच्या व शहरातील सुसंस्कृत तरुण आणि जबाबदार नागरिकांच्यावतीने तुमचा अभ्यास वर्ग घेण्यासाठी रोज यायला तयार आहे. तुमचा जसा "दहशत" या विषयाचा दांडगा अभ्यास आणि वारसाहक्काने चालत आलेला प्रदीर्घ अनुभव आहे, तसा माझा महापुरुष, त्यांचे कार्य, इतिहास, भूगोल, विज्ञान, कला अशा विविध गोष्टींचा सखोल व दांडगा अभ्यास आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटले होते की, "महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन तुम्ही काम करतो." यावर किरण काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील गाण्यांवर नाच करायची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली ? तुम्ही महाराजांच्या केलेल्या अवमानासाठी तुम्हाला शिवप्रेमी अजन्म माफ करणार नाहीत. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात कधी महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास केला असता तर तुम्हाला नक्कीच महाराजांच्या पुतळ्यासमोर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून आपण कसे वागावे याची प्रेरणा मिळाली असती. पण ही गोष्ट म्हणजे "आपके बस की बात नही" असा टोला काळे यांनी आमदारांना लगावला आहे.

काळे पुढे म्हटले की, आमदारांनी याप्रसंगी घोषणा केल्याप्रमाणे महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविणे, धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करणे, त्याचबरोबर महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे शहरात उभे करणे ही कार्य जरूर करावीत. किंबहुना शहराचे लोकप्रतिनिधी या नात्याने त्यासाठी आम्ही तुमच्याकडे पाठपुरावा करतच राहू. मात्र नुसते पुतळे उभे करण्याऐवजी त्या जोडीने या महान कार्य करणाऱ्या महापुरुषांचे चरित्र समजून घेत चांगल्या विचारांचे आचरण करावे, असा सल्ला काळे यांनी दिला आहे.

काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना पाठवलेली महापुरुषांची ही पुस्तके आपल्या समवेत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणाऱ्या आपल्या टवाळखोरांना देखील वाचनासाठी त्यांनी उपलब्ध करून द्यावीत. ते जर ही पुस्तके उपलब्ध करून देऊन देखील वाचणार नसतील तर ती पुन्हा आम्हाला पाठवून देण्यात यावी. जेणेकरून ही पुस्तके शहरातील इतर तरुणांना वाचनासाठी आम्ही उपलब्ध करून देऊ शकू, अशी बोचरी टीकाही काळे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT