Vidhan Bhavan  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पुन्हा दिवाळी साजरी करण्याची सोलापूरच्या लोकप्रतिनिधींची संधी या कारणांमुळे हुकली...

आम्हाला मतदानाचा अधिकार दिल्याशिवाय ही निवडणूक घेऊ नये अशी मागणी करत मोहोळ, माढा व माळशिरसमधील भावी नगरसेवकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

प्रमोद बोडके

सोलापूर : दिवाळीनंतर पुन्हा दिवाळी साजरी करण्याची संधी विधानपरिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीतून मतदारांना आली होती. अनपेक्षितपणे ही निवडणुक लांबणीवर पडल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. या निवडणुकीसाठी मतदार संघातील 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कार्यान्वित असणे व मतदार संघातील 75 टक्के मतदार मतदानासाठी पात्र असणे आवश्‍यक आहे. या मतदार संघातील फक्त 58 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कार्यान्वित असल्याने सोलापूरची निवडणूक लांबणीवर पडली आहे. (The election of Solapur Legislative Council was postponed due to these reasons)

आम्हाला मतदानाचा अधिकार दिल्याशिवाय ही निवडणूक घेऊ नये अशी मागणी करत मोहोळ, माढा व माळशिरसमधील नगरपरिषद/नगरपंचायतीमधील भावी नगरसेवकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आमच्या मतदानाच्या हक्कावर गदा आणू नका, विधानपरिषदेची निवडणूक आताच घ्या या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य व जिल्ह्यातील जुन्या नऊ नगरपरिषदांचे सदस्य एकवटले आहेत. त्यामुळे निवडणूक झाली तरीही आणि निवडणूक लांबणीवर पडली तरीही सोलापूरच्या निवडणुकीचा विषय न्यायालयात जाणार हे जवळपास निश्‍चितच होते.

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील पाच मतदार संघातील विधानपरिषदेच्या सहा जागांची निवडणूक जाहीर करताना या निवडणुकीसाठी मतदार संघातील 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कार्यान्वित असणे व मतदार संघातील 75 टक्के मतदार मतदानासाठी पात्र असणे या दोन निषकांचा ठळकपणे उल्लेख केला आहे. निवडणूक आयोगाने हा नियम कशासाठी केला याकरिता 1988 मध्ये निवडणूक आयोगाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात शिवाजी व इतर व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाचाही संदर्भ दिला आहे. सोलापूर पहिल्याच निकषात 58 टक्‍क्‍यांवर अडकल्याने दुसऱ्या निकषापर्यंत पोहोचला नसल्याचेही समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूक आयोगाला पाठविलेल्या माहितीच्या नकला भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व मंगळवेढ्याचे नगरसेवक अजित जगताप यांनी घेतल्या आहेत. निवडणूक आताच या मागणीसाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.

फक्त श्रीपूर-महाळुंगची संख्या धरली गृहित

जिल्ह्यात अकलूज नगरपरिषद, नातेपुते, वैराग, श्रीपूर-महाळुंग व अनगर येथे नव्याने नगरपंचायत अस्तिवात आली आहे. श्रीपूर-महाळुंगचे राजपत्र प्रसिध्द होताना त्यामध्ये निवडून येणारे 17 व स्विकृत दोन अशा 19 सदस्य संख्येचा उल्लेख करण्यात आला आहे. असा उल्लेख जिल्ह्यात अकलूज नगरपरिषद, नातेपुते, वैराग व अनगरच्या बाबतीत नसल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी फक्त श्रीपूर-महाळुंगच्या नगरसेवकांची संख्या गृहीत धरण्यात आली होती. मुदत संपलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यादीत मोहोळ नगरपरिषद, माढा व माळशिरस नगरपंचायतीच्या 57 सदस्य संख्येचाही उल्लेख करण्यात आला आहे.

निवडणुकीसाठी 83 टक्के मतदार पात्र

जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायती व नगरपरिषदांमध्ये फक्त श्रीपूर-महाळुंगची सदस्य संख्या निश्‍चित झाल्याने, जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती सभापती व जुन्या नऊ नगरपरिषदा (बार्शी, कुर्डूूवाडी, करमाळा, सांगोला, पंढरपूर, मैंदर्गी, दुधनी, अक्कलकोट, मंगळवेढा) येथील विद्यमान सदस्यांची संख्या याची टक्केवारी 83 टक्के होते. निवडणुकीसाठी पात्र मतदारांची टक्केवारी 83 टक्के आहे परंतु लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कार्यान्वित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची टक्केवारी 58 आहे. निवडणुकीसाठी दोन्ही निकष पूर्ण होत नसल्याने सोलापूरची निवडणूक लांबणीवर पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT