Ajit Pawar-Sanjaymama Shinde-Dhawalsinh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP : राष्ट्रवादीच्या घड्याळाची चावी धवलसिंह मोहिते पाटील अन्‌ संजयमामा शिंदेंच्या हाती; अजितदादांसाठी अस्तित्वाची लढाई

Nagar Parishad Election 2025 : कुर्डुवाडी व अकलूज नगरपरिषद निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्ह्यातील नागरी अस्तित्वाची खरी परीक्षा मानल्या जात आहेत. या निकालावर पक्षाच्या राजकीय भविष्याचे समीकरण ठरणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुनर्पायाभरणीचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कुर्डुवाडी आणि अकलूज नगरपरिषदेतील निकालांवर राष्ट्रवादीचे नागरी अस्तित्व व प्रमुख नेत्यांच्या भवितव्याचा परिणाम होणार आहे.
करमाळा, मंगळवेढा व मोहोळ येथे युती, गोंधळ आणि उमेदवारीतील अडचणींमुळे पक्षाची स्थिती मिश्र आहे.

Solapur, 21 November : विधानसभा निवडणुकीत अस्तित्व हरवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पायाभरणी मानली जात आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची पूर्ण मदार कुर्डुवाडी आणि अकलूज नगरपरिषदेवर असणार आहे. या दोन नगरपरिषदेत राष्ट्रवादी कशी कामगिरी करणार? यावर जिल्ह्याच्या नागरी भागातील राष्ट्रवादीचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.

कुर्डुवाडीत माजी आमदार संजयमामा शिंदे (SanjayMama Shinde ) यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या सर्वच्या सर्व २० जागांवर घड्याळाचे उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत माजी आमदार शिंदे यांनी रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) सोबत घेतले आहे.

माढा तालुक्यात असलेल्या आणि करमाळा विधानसभेत येणाऱ्या कुर्डुवाडी नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादीसाठी व माजी आमदार शिंदे यांच्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या निवडणुकीच्या निकालावर भविष्यातील अनेक राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील (Dhwalsinh Mohite Patil) हे शिवसेना, काँग्रेस या मार्गे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावले आहेत. अकलूजमध्ये मोहिते-पाटलांचा राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीचा मोहिते-पाटलांचा मोठा आधार मानला जात आहे. अकलूज नगरपरिषदेतील नगराध्यक्षाच्या व नगरसेवकाच्या सर्वच्या सर्व २६ जागांवर उमेदवार दिले आहेत. अकलूज नगरपरिषदेच्या निकालावर या तालुक्यातील राष्ट्रवादीची आणि डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांची नवी राजकीय इनिंग अवलंबून असल्याचे मानले जाते.

करमाळा नगरपरिषदेत राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केली आहे. या नगरपरिषदेत राष्ट्रवादीने १३ जागेवर उमेदवार दिले आहेत. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहेत, त्याच ठिकाणी भाजपनेही उमेदवार दिले आहेत.

मंगळवेढ्यात मोठा झटका

मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित जगताप यांच्या घरात ऐनवेळी भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्यामुळे मंगळवेढा नगरपरिषदेत राष्ट्रवादीची मोठी अडचण झाल्याचे दिसते. या नगरपरिषदेत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अशी तिघांची महायुती आहे. भाजपने या नगरपरिषदेत राष्ट्रवादीला नगरसेवकाच्या ४ जागा दिल्या आहेत. या नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष आहे.

मोहोळमधून घड्याळ गायब

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेल्या उमेश पाटील यांच्या मोहोळ नगरपरिषदेत घड्याळाच्या चिन्हावर एकही उमेदवार मैदानात नाही. या ठिकाणी शिवसेनेचे नेते माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील प्रचारात आहेत. या तालुक्यात अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने दाखल केलेला उमेदवारी अर्ज अपात्र झाल्याने मोहोळ नगरपरिषद व अनगर नगरपंचायतीच्या राजकीय पटलावरून पहिल्यांदाच घड्याळ गायब झाले आहे.

Q1. राष्ट्रवादीसाठी कोणत्या दोन नगरपरिषदांचे निकाल सर्वात महत्त्वाचे आहेत?
A. कुर्डुवाडी आणि अकलूज नगरपरिषदांचे.

Q2. कुर्डुवाडीत राष्ट्रवादीसोबत कोणता पक्ष आहे?
A. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट).

Q3. मोहोळ आणि अनगरमध्ये राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर उमेदवार आहेत का?
A. नाही, दोन्हीकडे घड्याळ चिन्ह निवडणूक पटलावरून गायब आहे.

Q4. मंगळवेढ्यात राष्ट्रवादीची अडचण का निर्माण झाली?
A. भाजपने राष्ट्रवादी नेते अजित जगताप यांच्या घरातच नगराध्यक्ष उमेदवार घोषित केल्यामुळे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT