Radhakrishna Vikhe Patil in Shrirampur
Radhakrishna Vikhe Patil in Shrirampur Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : जमीन वाटपात गैरव्यवहार करणाऱ्यांना सोडणार नाही

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

Radhakrishna Vikhe Patil : मागील अनेक दिवसांपासून खंडकरी व आकारीपडित शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न प्रलंबित आहे. या जमीन वाटपात ज्यांनी ज्यांनी गैरव्यवहार केला त्यांची माहिती घेतली जात आहे. अशा लोकांना शासन केल्याशिवाय आपण गप्प राहणार नाही, असा गर्भित इशारा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी कोणाचे नाव न घेता दिला.

श्रीरामपूर शहर व तालुका भाजपच्या वतीने मंत्री विखे यांचा नागरी सत्कार सोहळा येथील उत्सव मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर होते. माजी आमदार चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, इंद्रभान थोरात, प्रकाश चित्ते, मारुती बिंगले, जितेंद्र छाजेड, गिरधर आसने, बबन मुठे, गणेश मुद्गुले, शरद नवले, संदीप चव्हाण, बाबासाहेब चिडे, नितीन दिनकर, सोनाली नाईकवाडी आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, खंडकरी व आकारीपडीत शेतकर्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या पाहिजे. मात्र, याप्रश्नी पूर्वीच्या सरकारची भूमिका नकारात्मक होती. आता जनतेचे सरकार सत्तेत आले आहे. त्यांना जमिनी परत मिळून दिल्या पाहिजे. यापूर्वी जमिनी देऊ नका म्हणून प्रक्रिया राबविण्यात आली, अशी टीका त्यांनी थोरात यांचे नाव न घेता केली. श्रीरामपुरातील अल्पवयीन मुलींच्या धर्मांतराबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणात ज्या-ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हात गुंतलेले आहे त्यांना सोडणार नाही. श्रीरामपूरला गुन्हेगारी मुक्त करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. श्रीरामपूर पाहिली नसेल एवढी मोठी कारवाई मी करून दाखवतो.

नगरला जागेअभावी न येणारे उद्योग श्रीरामपूरच्या एमआयडीसीत आले पाहिजेत. व्हिडीओकॉनसारखी कंपनीला विरोध झाला. मुळा-प्रवरासारखी संस्था गेल्याने अनेकांचे रोजगार गेले. नवे उद्योग येऊ शकले नाही. तरुणांनी आता पुढे येवून संघटन करावे. स्टार्टअपसारख्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. मागील पाच वर्षांत श्रीरामपूर पालिकेने खड्ड्यात, तर तालुक्याची गुंतवणूक ठेकेदारावर झाली असा आरोप माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक व आमदार लहू कानडे यांचे नाव न घेता त्यांनी केला. आगामी पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शंभर टक्के भाजप असा नारा यावेळी त्यांनी दिला. तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार मुरकुटे, कदम, नवले, चित्ते, राठी, गोंदकर यांची भाषणे झाली.

प्रवरेचा संत

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे प्रवरेचे संत आहेत. त्यांना प्रवचन, कीर्तन येत नाही, मात्र ते राजकीय कीर्तन करतात. राहाता तालुक्याबरोबरच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न घेऊन ते पुढे चालले आहेत. नगर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र गोवा राज्यापेक्षाही मोठे आहे. त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा करण्याबरोबरच देवळाली प्रवरा तालुका करावा, अशी अपेक्षा माजी आमदार कदम यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT