कर्जत ( जि. अहमदनगर ) - राज्य सरकारने वाढती लोकसंख्या लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्यातील 12 जिल्हा परिषद गट व 24 पंचायत समित्या गण वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी 12 तालुक्यांत प्रत्येकी एक गट व दोन गण वाढत आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत. बदलती राजकीय समीकरणे राजकीय पक्ष स्थित्यंतराला कारण ठरू लागली आहेत. ( The reason for the change of party is the formation of a new group in Karjat )
कर्जत तालुक्यात एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गणांची भर पडणार आहे. त्यामुळे पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती गण अस्तित्वात येतील. मात्र, चापडगाव गटाची निर्मिती करताना गावांच्या तोडफोडीमुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. एका पक्षाचे तब्बल चार पदाधिकारी दुसरीकडे उडी मारण्याच्या तयारीत आहेत.
आरक्षण काय निघणार, याबाबत उत्सुकता आहे. इच्छुक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडणार आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतील पराभवाचा वचपा राम शिंदे काढणार का, याबाबत उत्सुकता आहे. मागील निवडणुकीवेळी सोबत असलेले अनेक कार्यकर्ते सोडून गेल्याने समीकरणे बदलली आहेत.
कर्जत तालुक्यात सध्या राष्ट्रवादीचे दोन व भाजपचे दोन जिल्हा परिषद सदस्य आहेत. पैकी भाजपच्या एका जिल्हा परिषद सदस्याचे निधन झाले आहे. अंतराने लांब असलेली गावे काही गटांना जोडली गेल्याने, तुलनेत अंतराने कमी आणि नियमित व्यवहार- संपर्क असलेली गावे बाजूला फेकली आहेत. रातंजन हे मिरजगावला जवळ असताना त्याला चापडगाव गटाला, तर चिंचोली काळदात हे गाव कोरेगाव गटाच्या जवळ असताना कुळधरण गटाला जोडले आहे. अशी अनेक गावे पूर्वीच्या गटापासून तुटली आहेत. याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो.
महाविकास आघाडी झाल्यास इच्छुकांची वाढती संख्या डोकेदुखी ठरू शकते. भाजपची सर्व मदार राम शिंदे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर आहे. नगरपंचायत निवडणुकीत जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी किल्ला लढविला. शिवसेना अजून ॲक्टिव्ह मोडमध्ये आली नाही. मनसेचे अस्तित्व नावालाच आहे.
संभाव्य गट आणि गण
कोरेगाव गट - कोरेगाव गण- बजरंगवाडी, कुंभेफळ, धांडेवाडी, नेटकेवाडी, अळसुंदे, निंबे, बेनवडी, कोळवडी, थेरवडी आणि तोरकडवाडी. शिंदे गण-बिटकेवाडी, माळेवाडी, नांदगाव, वडगाव तनपुरा, रेहेकुरी, वालवड, सुपा, बहिरोबावाडी, पठारवाडी, गोयकरवाडी, खंडाळा, चिंचोली काळदात, कापरेवाडी.
कुळधरण गट- कुळधरण गण- भोसे, चखालेवाडी, रुईगव्हाण, कोपर्डी, सुपेकरवाडी, दूरगाव, राक्षसवाडी (खुर्द आणि बुद्रुक), धालवडी, तळवडी आणि ताजू. बारडगाव सुद्रिक गण- बारडगाव दगडी, येसवडी, बेलवंडी, पिंपळवाडी, जलालपूर, सिद्धटेक, बेर्डी, करमनवाडी, वायसेवाडी आणि आखोणी.
राशीन गट- राशीन गण- सोनाळवाडी, कानगुडवाडी, देशमुखवाडी, चिलवडी आणि होलेवाडी. भांबोरा गण- हिंगणगाव, दुधोडी, गणेशवाडी, खेड, औटेवाडी, शिंपोरा, बाभूळगाव दुमाला, मानेवाडी, करपडी, परीटवाडी, काळेवाडी, रावकाळे वाडी.
चापडगाव गट- चापडगाव गण-पाटेवाडी, म्हाळंगी, मलठण, लोणी मसदपूर, दिघी, निमगाव डाकू, आंबी जळगाव, जळकेवाडी, नवसरवाडी, खातगाव, शेगूड, डोंबळवाडी, आनंदवाडी आणि हंडाळवाडी. पाटेगाव गण - माही, जळगाव, बाभूळगाव खालसा, डिकसळ, नागलवाडी, नागापूर, निंबोडी, रातंजन, सीतपूर, टाकळी खंडेश्वरी आणि तरडगाव
मिरजगाव गट-मिरजगाव गण-गोंदर्डी, निमगाव गांगर्डा, मांदळी, घुमरी, बेलगाव, कोकणगाव आणि तिखी कोंभळी गण-चिंचोली रमजान, थेरगाव, नागमठाण, खांडवी, रवळगाव, कौडणे, मुळेवाडी, चांदे (बुद्रुक व खुर्द), खुरंगेवाडी, गुरव पिंप्री आणि थेटेवाडी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.