Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil  Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

नगर-मनमाड रस्त्याचे काम होणार सुरू : सुजय विखेंनी टक्केवारी मागणाऱ्यांना दिला हा इशारा

अमित आवारी

Dr. Sujay Vikhe Patil : नगर-मनमाड रस्त्याच्या कामाबाबत केंद्राच्या एका पथकाने आज पाहणी केली. त्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी शिंगवे येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार डॉ. विखे पाटील यांनी नगर-मनमाड रस्त्याची निविदा केव्हा निघणार, काम केव्हा सुरू व पूर्ण होणार याच्या तारखाच जाहीर केल्या. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले की, नगर-मनमाड रस्त्याची पाहणी केंद्राच्या एका पथकाने आज केली. त्या दौऱ्यात मी होतो. रस्त्याची अवस्था त्यांनी पाहिली आहे. ६८० कोटी रुपये या कामाचा दर निश्चित करण्यात आला आहे. हा दर जीएसटी सोडून आहे. या रस्त्याच्या कामासाठी पुढील आठवड्यात सुमारे ८०० कोटी रुपयांची निविदा निघणार आहे. रस्त्याच्या वरील खड्डे बुजविण्यासाठी ८ कोटी रुपये आणले आहेत. त्यानुसार कारपेटींगचे काम सुरू आहे.

ते पुढे म्हणाले की, या रस्त्याच्या कामाची कोणीही जबाबदारी झटकलेली नाही. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. कोणीही खासदार व लोकप्रतिनिधी स्वतःहून जाऊन रस्ता खराब करत नाही. तर उड्डाणपूल पूर्ण झाला नसता. बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्णत्वास आले नसते. नगर-करमाळा रस्ता पूर्ण होत आला नसता. ठेकेदार नेमणे खासदाराच्या हाती नसते. नगर-मनमाड रस्त्यामुळे जनतेला झालेल्या त्रासा बद्दल मी जनतेची माफी मागतो. आम्ही केलेल्या कामाला ठेकेदारांकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही. मात्र रस्त्याचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा पुढील आठवड्यात संपेल. नियमाप्रमाणे ४५ दिवसांची निविदा असते मात्र आपण शॉर्ट टेंडर केले आहे. ३० दिवसांत या कामाला ठेकेदार मिळेल. नव्या ठेकेदाराकडून नवीन वर्षाच्या सुरवातीस म्हणजे १ जानेवारीला रस्त्याच्या कामाला प्रारंभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नवीन ठेकेदार नेमण्याचा अधिकार ई टेंडरींग प्रमाणे शासनाला असतो. त्यामुळे साईबाबा चरणी एकच प्रार्थना करेल की या रस्त्याच्या कामाचा ठेकेदार जुनाच येऊ नये. हा मानवी हातातील विषय राहिलेला नाही. नवीन ठेकेदार आल्यावर कोणी टक्केवारी मागण्याचा प्रयत्न केल्यास. मी पत्रकार परिषद घेऊन त्या लोकप्रतिनिधीचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्या शिवाय शांत राहणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात टक्केवारी मागण्याची जी प्रथा मागील काही वर्षांपासून सुरू होती, ती यापुढे होणार नाही. कारण जनतेचे होणारे नुकसान पुन्हा भरून येणार नाही. नवीन ठेकेदार आल्यावर एका वर्षात म्हणजे १ जानेवारी २०२४ पर्यंत रस्ता चांगला केला जाईल. याच निविदेनुसार रस्त्याच्या ७५ किलोमीटरपर्यंतच्या दुरुस्तीचेही काम घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते चांगले होत आहेत. नगर जिल्हा विकासाकडे जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन विकासात्मक धोरण ठेवल्यास जिल्ह्यात पुढील काळात निश्चित विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगर-करमाळा रस्त्यासाठी वाईटपणा

नगर-करमाळा रस्त्याच्या कामाचा वेग घेण्यासाठी काही धार्मिक स्थळांचे स्थलांतर करावे लागेल. त्यासाठीचा वाईटपणा मी घेत आहे. विकासासाठी वाईटपणा घेण्यास मी तयार आहे. त्याला कोणी धार्मिक, जातीयतेचे स्वरुप दिले तर त्याला मी महत्त्व देत नाही. कोणी रस्त्याच्या कामात अडथळा आणत असेल तर त्याचा सामना करून रस्त्याचे काम वेगात पूर्ण केले जाईल, असे खासदार डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT