Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : त्यांची ओरड म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा... उदयनराजेंचा पलटवार

Umesh Bambare-Patil

सातारा : सातारा विकास आघाडीने मागील पंचवार्षिक निवडणुकीत वचननामा दिला होता. त्यामधील सर्व कामे मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. केलेल्या कामाचे जाहिर ऑडीट करणारी सातारा विकास आघाडी राज्यात एकमेव ठरली आहे. तरी सुध्दा स्वतः बाळबोध असल्याचे समजुन साविआ आणि आमच्यावर भ्रष्टाचार, कमिशन, टक्केवारी आदी आरोप होत आहेत. भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेल्या व्यक्तीने अशी ओरड करणे म्हणजे चोराच्या उलटया बोंबा आहेत, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळून केली आहे.

शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केलेल्या सातारा पालिकेतील भ्रष्टाचाराबाबतच्या मुद्द्याबाबत दुध का दुध-पानी का पानी होऊन जावू द्यात या विचारातुन खासदार उदयनराजेंनी प्रसिध्दी पत्रकातून त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. उदयनराजेंनी म्हटले की, नागरीकांनी आम्हाला ज्या विश्‍वासाने भरभरुन प्रेम दिले आहे. त्या विश्‍वासाला तडा जावू न देता, सातारा पालिकेचा कार्यकाल अतिशय संयमाने चालवण्यात आला. फक्त साविआच्याच नगरसेवकांची नाही तर सर्वच नगरसेवकांची कामे समयोचित प्रकारे मार्गी लावली होते.

राज्याचे आणि केंद्राचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान, घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अमृत योजना, वित्त आयोग या सर्व केंद्राच्या योजना असून, त्यामधुन भरघोस निधी प्राप्त करुन घेण्यात आला आहे. सातारा विकास आघाडीच्या वचननाम्यातील कास धरण उंची वाढवणे, भुयारी गटर योजना, घनकचरा व्यवस्थापन, नवीन प्रशासकीय इमारत, ग्रेडसेपरेटर, आयुर्वेदिक गार्डन, शहरातील सर्व उद्यानांचे नुतनीकरण, जेष्ठ नागरीक भवन, घरकुल योजना, शहीद कर्नल संतोष महाडीक यांचे स्मारक, हद्दवाढ भागाकरीता सुरु करण्यात आलेली सहा नवीन नागरी आरोग्य केंद्रे हे मुख्य मुद्ये मार्गी लागले आहेत.

हे ज्यांचा वारसा सांगतात ते सर्व सत्ताधीश असतानाही त्यांनी कचरा उचलण्याच्या पध्दतीत सुधारणा केली नाही. आम्ही कुंडीमुक्त शहर ही संकल्पना राबविणेकरीता घरोघरी घंटागाडया सुरु केल्या. घंटागाडया सुरु करणारी पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा नगरपरिषद ही पहिली नगरपालिका ठरली.

हॉस्पिटल ओनर्स असोशिएशनच्या माघ्यमातुन सर्वांत घातक ठरणारा बायोमेडीकल वेस्ट गोळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली. त्यांच्या सहकार्याने बायोमेडीकल वेस्ट प्लॅन्टसाठी जागा देवून तो उभारला. कचरा शहरात साठुच नये म्हणून सर्व उपाययोजना केल्या ज्या योजना यापूर्वी कधीही सर्वसत्ताधिश सत्ताधारी असताना केल्या गेल्या नाहीत. कच-याचे विलगीकरण करुन, त्यावर प्रक्रीया करण्याचा घनकचरा प्रकल्प सुरु केला.

सातारा विकास आघाडी हे एक मोठे कुटुंब आहे. सातारकर नागरीक हे सातारा विकास आघाडीच्या कुटुंबातील सदस्य आहेत. या सदस्य नागरीकांना दैनंदिन गरजा सक्षमपणे पुरवणे बाबतची काळजी आम्ही नेहमीच घेतली आहे. असे असताना कच-याबाबत, घंटागाडयांबाबत भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत. हे आरोप करताना त्यांनी पुराव्यानिशी बोलले पाहिजे. अन्यथा, साविआची बदनामी करणे इतकाच प्रकार त्यांच्या कृतीतुन दिसत आहे. हा त्यांचा संकुचित स्वभाव आणि कर्मदरिद्रीपणाच म्हणावा लागेल, अशा शब्दात उदयनराजेंनी फटकारले आहे.

गांधी मैदानावर आमने, सामने या....

आम्ही यापूर्वीच त्यांना समोर येण्याचे आव्हान अनेकदा केले आहे. परंतू त्यावेळी नसलेली शेपुट घालुन, कधीही आमचे आव्हान यांनी स्विकारले नाही. आता नव्याने आव्हान देत आहेत. निधी किती आणला याबाबतचे त्यांचे आव्हान आम्ही नम्रपणे स्विकारतो. परंतू त्याकरीता गांधी मैदान येथे आमने-सामने झाले पाहिजे. वेळ आणि तारीख दोघांच्या सोयीची असावी. आम्ही तयार आहोत. कर नाही त्याला डर कशाला, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT