Mahesh Shinde
Mahesh Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

`रयत`मध्ये सातारा जिल्ह्यातील तरुणांना नोकऱ्या नाहीत...

सरकारनामा ब्युरो

विसापूर : रयत शिक्षण संस्था ही आमच्या हक्काची संस्था असून देखील गेल्या सात वर्षांत जिल्ह्यातील एकाही तरुणाला या संस्थेत रोजगार मिळालेला नाही. काही नेते 'रयत'मध्ये संचालक म्हणून जातात आणि जिल्ह्यातील एकाही युवकाला नोकरी लागत नाही. त्याला नोकरी लागायला चाळीस-चाळीस लाख रुपये मागितले जातात, ही मोठी शोकांतिका आहे, अशी टीका कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.

काटकरवाडी (ता. खटाव) येथे खटाव-पुसेगाव रस्ता आणि काटकरवाडी येथील जोतिबा सभामंडपाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सेवगिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, भाजप जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, खटावचे राहुल पाटील, पप्पू काटकर, कटगुणच्या सरपंच जयश्री गोरे, बुधचे सरपंच अभयराजे भोसले, डॉ. सोमनाथ काटकर, प्रकाश जाधव, नितीन पाटील, गारवडीचे सरपंच शिवाजी कदम, नवनाथ फडतरे, वर्धनगडचे सरपंच अर्जुन मोहिते, सुसेन जाधव, रोहन देशमुख, शंतनू वाघ व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार महेश शिंदे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. या संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत, अशी घटना आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. रयत शिक्षण संस्था सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या पैशातून उभी राहिलेली आहे. या संस्थेचा कारभार मुख्यमंत्र्यांच्या हातात येऊन ती पुन्हा सर्वसामान्यांची झाली पाहिजे. आता घटनेप्रमाणे 'रयत'चे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हवे होते. मात्र, परिस्थिती वेगळी आहे.

ते म्हणाले, ''रयत शिक्षण संस्थेने सातारा जिल्ह्यातील लोकांना सर्वात जास्त नोकऱ्या दिल्या आहेत. पूर्वी 'रयत'मध्ये सर्वात जास्त कर्मचारी सातारा जिल्ह्यातील होते. मात्र, आमच्या हक्काची संस्था असून देखील गेल्या सात वर्षांत जिल्ह्यातील एकाही तरुणाला रयत शिक्षण संस्थेत रोजगार मिळालेला नाही. काही नेते रयत मध्ये संचालक म्हणून जातात आणि जिल्ह्यातील एकाही युवकाला नोकरी लागत नाही. त्याला नोकरी लागायला चाळीस-चाळीस लाख रुपये मागितले जातात, ही मोठी शोकांतिका आहे.

त्यामुळे माजी आमदारांना विनंती आहे. तुम्ही संचालक आहात. 'रयत'च्या या प्रश्नाबाबत आंदोलन उभारून संस्था आमच्या तरुणांच्या, सातारकरांच्या, कामगारांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. माझा वारसाच प्रत्येक ठिकाणी हक्क गाजवतील, हा यशवंतराव चव्हाणांचा विचार नाही. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांपासून ते किती लांब गेले आहेत यावरूनच कळत आहे. भविष्यात जे मुख्यमंत्री होतील त्यांच्याच हातात संस्थेचा कारभार राहिला पाहिजे. ही माझी स्वतःची भूमिका आहे. यासाठी आपल्या सर्व जनतेला लढा उभारावा लागेल, असे ही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT