Keshavrao Bhosale Theater Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Keshavrao Bhosale Theater Fire : केशवराव भोसले नाट्यगृह आगप्रकरणात ट्विस्ट! महावितरणने दिली मोठी माहिती; घातपाताचा संशय

Rahul Gadkar

Kolhapur Political News : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर अनेक मुद्दे ऐरणीवर आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांकडून या आगीमागे घातपातीचा संशय व्यक्त केला जात आहे.

कोल्हापूर वासियांचा सांस्कृतिक आणि क्रीडा वारसा जपत असलेल्या या दोन्ही वास्तू खाक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही आग प्रथमदर्शिनी शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र या आगीशी महावितरणचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दिलेल्या खुलासामुळे चांगलाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे नाट्यगृहातील आग ही घातपात असल्याचा संशय आणखीन गडद होण्याची चिन्ह निर्माण झालेत.

महावितरण ने खुलासा करताना म्हटले आहे की, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावाने महावितरणकडून वीज जोडणी देण्यात आली आहे. महावितरणचा हा उच्चदाब ग्राहक आहे.

नाट्यगृहास वीज पुरवठा करणारी महावितरणची यंत्रणा (CT-PT, रोहित्र व मीटरींग युनिट) ही नाट्यगृहाच्या इमारतीपासून दूर मोकळ्या जागेत सुमारे १०० फूट अंतरावर आहे.

महावितरणची जबाबदारी ही मीटरींग युनिट पर्यंत असते. तेथून पुढे सर्व जबाबदारी ही संबंधित ग्राहकाची असते. तसेच नाट्य गृहातील अंतर्गत वीज वितरण व्यवस्था ही महानगरपालिकेकडून पाहिली जाते.

सद्यस्थितीत नाट्यगृहास वीज पुरवठा करणारी महावितरणची सर्व यंत्रणा सुस्थितीत आहे. त्यामुळे संबंधित आगीच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

आताच कशी काय लागली आग?

नाट्यगृहाच्या नूतनीकरणावर झालेल्या खर्चाबाबत अनेकांनी साशंकता व्यक्त केलेली होती. प्रत्यक्षात झालेला खर्च दाखवण्याची मागणी केलेली होती. सदर नाट्यगृहाबाबत सर्वपक्षीय कृती समितीने प्रत्यक्ष जागेवर पंचनामा करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानुसार 10 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरले होते असे समजते.

त्याच्या एक दिवस आधीच सदर नाट्यगृहाला आग लागून ते नष्ट होणे हा प्रकार संशयास्पद आहे. त्यामुळे या आगीमागे घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आगीची केवळ अपघात म्हणून नोंद न करता याबाबत गुन्हा नोंद होणे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT