Rajendra Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajendra Raut : ‘रवींद्र गायकवाडांना ५५ हजारांचे लीड दिलं; पण विधानसभेला माझा पराभव झाला होता’

प्रशांत काळे

Barshi, 09 June : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्हाला बार्शीतून कमी मताधिक्क्य मिळणार, याची चाहूल लागली होती. कारण महाविकास आघाडीची लाट होती. पण, मागे शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांना आम्ही बार्शीतून ५५ हजारांचे मताधिक्य दिले होते. पण, विधानसभा निवडणुकीत माझा पाच हजार मतांनी पराभव झाला होता, अशी आठवण सांगत आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानसभा निवडणुकीपर्यंत हे वातावरण बदलेल, असा आशवाद व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना बार्शीतून तब्बल ५५ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्याबाबत बार्शीचे भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी भाष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्हाला बार्शीतून (Barshi) कमी मताधिक्क्य मिळणार, याची चाहूल लागली होती. कारण महाविकास आघाडीची लाट होती, असेही राऊत यांनी मान्य केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिव (Dharashiv) लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर, तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील हे आमने सामने आले होते. या निवडणुकीत महायुतीचे आमदार या नात्याने अर्चना पाटील यांच्या प्रचाराची धुरा बार्शीत राजेंद्र राऊत यांनी सांभाळली. निकालानंतर निंबाळकरांना बार्शीतून ५५ हजारांचे लीड मिळाल्याचे उघड झाले.

यासंदर्भात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, विरोधकांनी मराठा आरक्षण, सोयाबीन, कांदा, दूधदर असे प्रश्न तसेच संविधान बदलाबाबतचे मुद्दे उपस्थित केले. त्यामुळे राज्यातील शेतकरी हा महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिला. महाविकास आघाडीची तीव्र लाटच होती, त्यामुळे आम्ही पराभव मान्य करतो.

प्रचारादरम्यान आम्हाला मताधिक्याबाबत चाहूल लागली होती. तसेच बार्शी तालुक्यात मराठा समाज 50 टक्के आहे. धाराशिव, बीड, जालना, नांदेड या भागात मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम जाणवत होता. त्यामुळे महायुती उमेदवारांच्या पराभवात हा मुद्दा निर्णायक ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आरक्षण मुद्याची तीव्रता लक्षात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला.

आगामी काळात जोमाने कामाला लागू. आगामी वर्षभरात विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेची निवडणूक होणार आहेत. त्या सतर्क राहून लढविल्या जातील. बार्शीतून विरोधकांना तब्बल 55 हजारांचे मताधिक्य मिळाले. पण महाविकास आघाडीत कुठेही जल्लोष दिसला नाही. विरोधकांनी विकासासाठी प्रयत्न करावे. मताधिक्याचे भांडवल आणि नौटंकी नये अन्यथा माझ्या स्टाईलने प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही राजेंद्र राऊत यांनी विरोधकांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT