village pistol
village pistol Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अशी तयार केली घरीच गावठी पिस्तुल : राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर झाडल्या गोळ्या

विलास कुलकर्णी

राहुरी ( जि. अहमदनगर ) - राहुरी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) माजी नगरसेविका तथा महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांची कन्या सोनाली बर्डे-माळी यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला करण्यासाठी गावठी पिस्तुल वापरण्यात आले होते. हे पिस्तुल कोठून आले याचा शोध घेण्यास पोलिस गेले असता अजब प्रकार त्यांच्या समोर आला. ( This is how a village pistol was made at home: bullets fired at a NCP corporator )

महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे यांच्या कन्या सोनाली बर्डे - माळी यांच्यावर भर दिवसा गोळीबार करून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. तशा सूचना नगर व राहुरीच्या पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी सांगितले होते.

राहुरी येथे रविवारी (ता. 20) रात्री नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी.‌ जी. शेखर पाटील यांनी अचानक भेट दिली होती. गावठी पिस्तुलातून झालेल्या गोळीबाराच्या घटनास्थळाची पाहणी करून, आरोपींच्या घराची पाहणी केली. आरोपींची कसून चौकशी केली. आरोपीचे यापूर्वीचे गुन्हे तपासून कडक कारवाई केली जाईल. असे शेखर पाटील यांनी सांगितले.

राहुरी येथे शुक्रवारी (ता. 18) दुपारी एक वाजता ग्रामीण रुग्णालयासमोरील एकलव्य वसाहतीत महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांची कन्या माजी नगरसेविका सोनाली बर्डे-माळी यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार झाला. त्यांच्या हाताच्या कोपरा खाली गोळी घुसली होती. नगर येथे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून, बाहेर काढलेली गोळी पोलिसांनी ताब्यात घेतली. घटनेच्या दिवशी तीन आरोपींना अटक करून, त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात, पोलिसांना गावठी पिस्तुल तयार करण्याचा कारखाना आढळला आहे. त्याचा स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला.

या घटनेची पोलिस उपमहानिरीक्षक शेखर पाटील यांनी गंभीर दखल घेतली. त्यांच्यासमवेत काल रात्री पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. उपस्थित महिला व नागरिकांशी संवाद साधून, आरोपींच्या घरात जाऊन, पाहणी करण्यात आली. नंतर अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली. आरोपी अंकुश पवारने स्वतःच्या घरीच गावठी कट्टा तयार केला, अशी माहिती शेखर पाटील यांनी दिली.

अशी केली गावठी पिस्तुल तयार

पोलिसांकडून गावठी कट्टा बनवण्यासाठी लागणारी उपकरणे, वापरलेला कट्टा जप्त करण्यात आला. घरगुती भांडणातून प्रकार घडला होता. आरोपी गावठी कट्टा बनवून त्याची विक्री करतो की नाही याची सखोल माहिती घेण्यात आली. गावठी कट्ट्याला लागणारी बुलेट कशी तयार करतो. याचीही माहिती आरोपीने दिली आहे. त्याने युट्युब वरील व्हिडिओ पाहून गावठी कट्टा तयार केल्याचे पोलिसांना सांगितले असल्याची माहिती, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT