Jaykumar gore, Prabhakar Deshmukh
Jaykumar gore, Prabhakar Deshmukh sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

व्यासपीठावरून पळून जाणाऱ्यांनी जामीनाची चिंता करावी; देशमुखांचा आमदार गोरेंना टोला

रूपेश कदम

दहिवडी : ''मी जलसंधारण सचिव असताना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून माणमध्ये ७५ कोटी रुपयांचे सिमेंट बंधारे मंजूर केले. पण, त्याचा कधी ढोल पिटला नाही. कारण ते आमचं कर्तव्य होतं. विरळी खोऱ्याचं हक्काचं टेंभूचं पाणी विरळीला निश्चितपणे मिळेल आणि ते आम्हीच आणणार असून महाविकास आघाडीच माणचा संपूर्ण पाणीप्रश्न सोडवेल,'' अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली. तसेच व्यासपीठावरून पळून जाणाऱ्यांनी जामीनाची चिंता करावी असा टोलाही त्यांनी लगावला.

विरळी (ता. माण) येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित शेतकरी मेळावा व कर्तृत्ववान नागरिकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, माजी सभापती श्रीराम पाटील, संजय जाधव, दादासाहेब मडके, संजय जगताप, बाळासाहेब काळे, प्रशांत विरकर, विक्रम शिंगाडे, सिध्देश्वर काळेल, संजय खिलारी, रामभाऊ झिमल, विजय जगताप, मधुकर झेडगे, अंकुश गाढवे, शरद काळेल आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रभाकर देशमुख म्हणाले, (कै.) सदाशिवराव पोळ, (कै.) खाशेराव जगताप ही मतभेद असून सुध्दा एकमेकांचा सन्मान ठेवून समाजासाठी राबणारी मंडळी होती. पण, नेहमीप्रमाणे आपले लोकप्रतिनिधी बरळत असून माण तालुक्याच्या संस्कृतीला न शोभणारी वक्तव्य करत आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य, पाणी यावर त्यांनी बोललं पाहिजे पण ते बोलत नाहीत. एमआयडीसी आणली म्हणायला यांना दहा वर्षे गेली. पण एमआयडीसीचं खरं श्रेय आमच्या अधिकारी सुपूत्रांचं आहे. अजित दादांनी स्पष्ट सांगितलंय कुणी काही म्हणोत एमआयडीसी माणमधून जाणार नाही.

प्रभाकर देशमुख म्हणाले, ''या भागाला पाणी न मिळण्याचं पाप या निष्क्रिय आमदारांनी केलंय. त्यांनी पाण्यासाठी प्रतिष्ठा पणाला न लावता पनवेलला भूखंड मिळविण्यासाठी लावली. मग ज्या भानगडी झाल्या त्या तुम्हालाच निस्तराव्या लागणार ना. तुम्ही ज्यांचा जोगवा घेवून फिरताय त्यांनी मला निर्दोष ठरवलंय. ज्यांनी खंडणी वसूल केली, विनयभंगाची तक्रार ज्यांच्यावर आहे त्यांनी जामिनासाठी घाबरावं. जातीचं विष पेरण्याचं काम यांनी केलं. माणसांना उभं करण्याऐवजी त्यांची डोकी फोडण्याचं काम केलं.''

आंधळी प्रकरणात ज्यांचं आयुष्य उध्वस्त झालंय त्याची जबाबदारी कोण घेणार? या लबाडाची लबाडी वडूज व दहिवडीतील जनतेनं ओळखली असून आता माण-खटाव मधील गावागावातील जनता ओळखू लागली आहे. त्यामुळे त्यांचं नियंत्रण सुटू लागलं आहे. शिळ्या कढीला ऊत आणणाऱ्यांनी आपण काचेच्या घरात राहतो हे लक्षात ठेवावं असा इशाराही त्यांनी दिला.

''उरमोडीचं पाणी खरंतर शरद पवार, अभयसिंह महाराज व शिवेंद्रसिंहराजें यांच्यामुळे आले. सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र भिजायला पाहिजे होतं पण दहा वर्षात फक्त नऊ हजार हेक्टरवर पोहचले आहे,'' असे ही त्यांनी नमुद केले. अभयसिंह जगताप म्हणाले, ''विरळी खोर्‍याने आमच्या कुटुंबाला भरभरुन प्रेम दिले. पाणी आंदोलनात या पंचक्रोशीने हिरहिरीने भाग घेतला. परंतू पाणी देताना यांच्यावर अन्याय झाला. अजूनही इथली माणसं पाण्यासाठी झगडत आहेत. यापुढील काळात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

दादासाहेब मडके व प्रशांत विरकर म्हणाले, ''राष्ट्रवादी कधी केलेल्या कामाची जाहिरात करत नाही अन न केलेल्या कामाचं श्रेय घेत नाही. पण विरोधकांचं या उलट आहे. काम कुणीही करा उद्घाटनला सर्वप्रथम हेच हजर असतात.'' विक्रम शिंगाडे म्हणाले, ''वरकुटे मलवडी परिसरातील पाच गावांना कधीच पाणी येणार नाही असं म्हणणार्‍यांना मला सांगायचं आहे आमच्या गावांमध्ये पाणी आलंय अन ते प्रभाकर देशमुख यांनी आणलंय. पोरगं झालं कोणाला अन बारसं घालतंय कोण? अशी अवस्था आमदाराची आहे.'' विश्वनाथ नलवडे म्हणाले, ''माणमधील शेवटच्या टोकाच्या या गावात शरद पवार यांच्यामुळे दहा सिमेंट बंधारे बांधले गेले. यासारखी कोट्यावधीची कामे या गावात राष्ट्रवादीमुळेच झाली.'' शरद गोरड यांनी सुत्रसंचालन केले तर वैभव गोरड यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT