कुकुडवाड (ता. माण) : मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायची, पाणी योजना पूर्ण करायची मस्ती आहेच. मी माणचे नव्हे, तर शरद पवारांचे राजकारण नासवलंय, हे जिल्ह्याला माहित आहे. पवारांचा सच्चा सैनिक म्हणविणारे प्रभाकर देशमुख भाजपमध्ये घ्या, म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हातापाया पडत होते. निवृत्तीनंतर ते पवारांचाच कार्यक्रम करायला निघाले होते, अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केली. दरम्यान, जनतेला लुबाडून भ्रष्टाचाराने गोळा केलेली त्यांची संपत्ती लवकरच रडारवर येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
विरळी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव, सिध्दार्थ गुंडगे, लिंगराज साखरे, बाळासाहेब माने, धर्मदेव पुकळे, सरपंच प्रशांत गोरड, बबनराव काळे, धनाजी कदम उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत देशमुखांनी कधी नव्हे ते मतदारसंघात जातीपातीचे राजकारण केले. पैशांच्या जिवांवर ८८ हजार मते घेतली. मात्र, कोरोना काळात ते कुलूपबंद होते. ते गायब असल्याची बोंबाबोंब सुरू झाल्यावर शेवटी-शेवटी विविध कंपन्यांकडून काही पैसे आणायचे नाटक करताना त्यातही भ्रष्टाचार केला, असे नमूद करून आमदार गोरे म्हणाले, ''लोधवडेतील देशमुखांच्या ऊसालाही मी आणलेले उरमोडीचे पाणी मिळते. मी मतदारसंघात आल्यावरच पाणी अडवा, पाणी जिरवा संकल्पना सुरू झाली.
साखळी सिमेंट बंधारे माझ्याच काळात झालेत. त्यामुळे जयकुमारचे नाव घ्यायचीही देशमुखांची लायकी नाही. ''मी त्यांच्यासारखा लुटारू रावण नाही. माण-खटावच्या जनतेचा मी सेवक आहे. मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायला मला पुन्हा आमदार व्हायचे आहे, त्यासाठी तुमच्यासारख्या बाजारबुणग्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही.'' नोकरीत असताना महत्त्वपूर्ण पदे भोगली. मात्र, तेव्हा कुणाला नोकरीला लावले नाही, असे सांगून आमदार गोरे म्हणाले, ''सीओ असताना एमआयडीसीसाठी काही केले नाही. नोकरीत त्यांना पगार किती होता, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, याची लवकरच चौकशी होणार आहे.''
''त्यांच्याकडील माल बघून त्यांचीच पार्टी त्यांना सोडत नाही. जनताही तुम्हाला सोडणार नाही. लवकरच जिहे-कठापूरच्या पाण्याने अंघोळ घालून त्यांचे शुध्दीकरण करावे लागणार'' असा टोलाही आमदार गोरेंनी लगावला. आमदार पडळकर म्हणाले, ‘‘जयाभाऊंच्या रूपाने दुष्काळी भागाचा आवाज विधानसभेत यापुढेही बुलंद राहणे गरजेचे आहे. जयाभाऊंचे पैसेवाले विरोधक भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती कुठून आली, याची चौकशी होऊन ते नक्कीच जेलमध्ये जाणार आहेत.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.